Kalyan Rural Flood Threat
नेवाळी : मुसळधार पावसात कल्याण ग्रामीण भागाची चिंता वाढली आहे. कल्याण शीळ रस्त्यावर असलेल्या देसाई खाडीवरील जुन्या पुलाला जलपर्णीने वेढा घातला आहे. मुसळधार पावसाची संततधार सुरु झाल्यानंतर नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते. नदीचे पाणी जलपर्णीला अडकून खाडी पात्रात जात नाही. त्यामुळे जलपर्णीला अडकून पाणी थेट मानवी वस्तीत प्रवेश करण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या निर्माण झालेल्या गंभीर समस्येकडे केडीएमसी सह जिल्हा प्रशासनाने देखील दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे मुसळधार पावसाची संततधार सुरु झाल्यास आजूबाजूच्या परिसराला पुराची चिंता भेडसावत आहेत.
कल्याण डोंबिवली सह आजूबाजूच्या परिसरात शनिवारी मुसळधार पावसाची संततधार सुरु होती. अनेक सखल भागात पाणी देखील साचले होते. त्यातच डोंगराळ भागात मुसळधार पाऊस झाल्याने नदीला पूर येत असतो. शनिवारी देखील नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. श्री मलंगगड भागातून वाहणारी नदी आणि उत्तरशीव नदी या दोन्ही नद्यांचा संगम देसाई खाडी पासून हाकेच्या अंतरावर होती. त्यामुळे निळजे हेवन परिसरात नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ होते. परंतु नदीला जलपर्णीचा असलेला वेढा पावसाळ्यात वाहून जातो.
यंदा जलपर्णीच्या हा वेढा चक्क जुन्या पुलाला असल्याने नागरिकांची चिमटा वाढली आहे. अवघ्या काही वेळच्या पावसात नागरिकांना पुराची चिंता जलपर्णीच्या वेढ्याने निर्माण केली आहे. मात्र या गंभीर समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कधी लक्ष देणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.