सापाड : योगेश गोडे
मुंबईसह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील उपनगरी रेल्वे सेवा ही लाखो प्रवाशांच्या जीवनवाहिनी आहे. मात्र वाढती लोकसंख्या, प्रवाशांची प्रचंड गर्दी आणि मर्यादित सुविधा यामुळे गेल्या काही वर्षांत रेल्वे अपघातांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे.
विशेषतः गर्दीमुळे गाडीत चढताना-उतरताना होणारे अपघात, प्लॅटफॉर्मवर ढकलाढकली आणि दरवाज्याबाहेर लटकून प्रवास करण्याच्या घटना पाहता गर्दीवर नियंत्रण राहण्यासाठी उपनगरी मार्गांवर 15 डब्यांच्या लोकल गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून कल्याण रेल्वे प्लॅटफॉर्मच्या विस्ताराचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
रेल्वेतील गर्दीमुळे फूटबोर्डवर लटकणे, प्लॅटफॉर्मवर उतरतानाची गर्दी या कारणांमुळे दरवर्षी शेकडो प्रवाशांना जीव गमवावा लागतो, तर अनेकांना गंभीर दुखापत होते. यावर ठोस उपाय म्हणून गाड्यांची वहनक्षमता वाढवणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. त्यातूनच 12 डब्यांच्या लोकलऐवजी 15 डब्यांच्या लोकल सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला. त्यामुळे 15 डब्यांच्या लोकल गाड्या सुरू झाल्यास एका फेरीत अधिक प्रवासी वाहून नेता येणार असून गर्दीचे दडपण कमी होण्यास मदत होणार आहे.
प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येणार असून प्लॅटफॉर्मवरील गर्दी नियंत्रणात येणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या अंदाजानुसार, 15 डब्यांच्या लोकलमुळे प्रत्येक गाडीमागे हजारो अतिरिक्त प्रवासी वाहून नेणे शक्य होणार आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.
15 डब्यांच्या लोकल सुरू करताना सर्वात मोठा प्रश्न समोर आला तो म्हणजे प्लॅटफॉर्मची लांबी कमी असल्याचा. सध्या मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांवरील प्लॅटफॉर्म हे फक्त 12 डब्यांच्या लोकलसाठीच सक्षम आहेत. अशा स्थितीत 15 डब्यांच्या लोकल सुरू केल्यास काही डबे प्लॅटफॉर्मच्या बाहेर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांना उतरण्या-चढण्यास अडचणी निर्माण होणार असून पुन्हा अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण होणार आहे. परिणामी 15 डब्यांची लोकल सुरू करण्याआधी प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम हाती घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला.
या रेल्वे प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम सध्या प्रत्येक रेल्वे स्टेशनवर युद्धपातळीवर सुरू झाले आहे. प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम शहाड स्टेशन ते आसनगाव दरम्यान वाशिंद खडवली टिटवाळा आंबिवली स्टेशनवर देखील मध्य रेल्वे प्रशासनाने सध्या युद्धपातळीवर 15 डब्यांच्या प्लॅटफॉर्मचे काम सुरू केले आहे.
विशेषतः प्रवासी संख्येच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मार्गांवर हे काम प्राधान्याने सुरू करण्यात आले आहे. शहाड ते आसनगाव दरम्यानची सर्व स्थानके आणि विठ्ठलवाडी ते कर्जत दरम्यानची सर्व स्थानके वरती रेल्वे प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम सुरू करण्यात आले आहे. या मार्गांवर रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे येथे 15 डब्यांच्या लोकल सुरू झाल्यास गर्दीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्लॅटफॉर्मची लांबी वाढवून सुरक्षितता पट्टे नव्याने बसवणे, विद्युत यंत्रणा आणि सिग्नलमध्ये बदल बनवणे, प्रवासी मार्गदर्शनासाठी सूचना फलक, दिव्यांग प्रवाशांसाठी सुविधा या सर्व कामांचा समावेश या प्रकल्पात करण्यात आला आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत हे काम सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणामुळे गर्दीवर नियंत्रण राहणार असून 15 डब्यांच्या लोकल व प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणामुळे रेल्वेतील वाढते अपघातही रोखले जातील. दरम्यान रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्मचे काम अंतीम टप्प्यात आले असल्याचे दिसून येत आहे.
काम अंतिम टप्प्यात
15 डब्यांच्या गाड्या सुरू झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाचा दावा आहे की, दररोजची गर्दी कमी होण्यास मदत होऊन फूटबोर्डवर प्रवास कमी होईल. दरवाज्याबाहेर लटकण्याचे प्रमाण देखील घटल्यास अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल. त्यामुळे 15 डब्यांच्या लोकल हा सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठा टप्पा ठरणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, 15 डब्याच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्मचे काम युद्धपातळीवर सुरू असून बहुतांश ठिकाणी काम अंतिम टप्प्यात आले आहे. काही स्थानकांवर 15 डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण झाले असून लवकरच त्याची चाचणी सुरू होणार आहे.
“15 डब्यांच्या लोकल सुरू झाल्या तर प्लॅटफॉर्म वरील गर्दी नियंत्रणात येऊन किमान गर्दीतून दिलासा मिळेल. सध्या प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत धरून प्रवास करण्यासारखे झाले आहे. 15 डब्यांच्या लोकल सुरू झाल्यानंतर अपघाताचे प्रमाण कमी होऊन रेल्वे प्रवास सुकर होण्यास मदत होईल”सुलोचना शिंदे. रेल्वे प्रवासी.