ठाणे

Kalyan Politics : कल्याण पूर्वमध्ये मनसेला मोठा सुरुंग; ८२०० मते घेणारे अनिकेत गायकवाड ठाकरे गटात

कल्याण पूर्वेतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. कल्याणमधील अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळख असलेले अनिकेत गायकवाड यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे कल्याण पूर्वेतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

हा पक्षप्रवेश सोहळा शिवसेनेचे उपनेते व लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, सहसंपर्कप्रमुख संतोष जाधव, विधानसभा संपर्कप्रमुख तुषार शिंदे, महिला संपर्कप्रमुख मृणाल यज्ञेश्वरी, जिल्हाप्रमुख शरद पाटील आणि अभिजित सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी जिल्हा संघटक कल्पना कवडे, अंजली राऊत, उपजिल्हाप्रमुख नारायण पाटील, तालुकाप्रमुख सुरेश पाटील, शहरप्रमुख हेमंत चौधरी, शहर संघटक मीना माळवे, अक्षरा पटेल, प्रियांका विचारे, उपशहर संघटक सुनीता ढोले, संगीता गांधी, जिल्हा समन्वयक सुधीर पाटील आणि विभागप्रमुख अरुण निंबाळकर यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जानेवारी २०२६ मध्ये पार पडलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत अनिकेत गायकवाड यांनी मनसेकडून प्रभाग क्रमांक ११ मधून निवडणूक लढवली होती. त्यावेळी तब्बल ८,२०० हून अधिक मते मिळवत त्यांनी आपला भक्कम जनाधार सिद्ध केला होता. हाच जनाधार आणि दांडगा राजकीय अनुभव लक्षात घेता, त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला स्थानिक पातळीवर मोठी ताकद मिळणार आहे.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना, "शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या विचारधारेवर आणि नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे," असे अनिकेत गायकवाड यांनी सांगितले. आगामी काळात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या पक्षप्रवेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी काळात पक्षाकडून गायकवाड यांच्यावर कोणती नवी जबाबदारी सोपवली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT