Kalyan Attack Pudhari
ठाणे

Kalyan Attack: निवडणुकीचा बदला घेण्यासाठी रुग्णालयात गुंडा गर्दी

मतदानाचा बदला रक्ताने?, म्हात्रे कुटुंबीयांवरील हल्ल्याने खळबळ; पोलीस तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

नेवाळी: ठाणे महापालिका निवडणुकीत दिलेल्या राजकीय पाठिंब्याचा बदला घेण्यासाठी एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा गंभीर आरोप कल्याण ग्रामीण भागात समोर आला आहे. विशेष म्हणजे मुख्य रस्त्यावर झालेल्या हल्ल्यानंतर उपचारासाठी दाखल असलेल्या जखमींना रुग्णालयात घुसून पुन्हा मारहाण करण्यात आल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे नाव समोर आल्याने राजकीय वर्तुळातही एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी येथे बारशाच्या कार्यक्रमादरम्यान विनोद म्हात्रे व विकास म्हात्रे यांना बाबुराव पाटील यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती विनोद यांनी त्यांचे बंधू सुनील पाटील यांना फोनद्वारे दिली.

त्यानंतर संबंधित कार्यक्रम आटोपून सर्वजण परतत असताना गुरुवारी मध्यरात्री कल्याण-शिळ मार्गावरील पडले नाका परिसरात पंढरीनाथ पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ पुन्हा वाद उफाळला आहे. सुनील म्हात्रे यांनी बाबुराव पाटील यांना मारहाणीबाबत जाब विचारला असता त्यांच्यावर सुरा व पकडीसारख्या हत्याराने हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे.

या हल्ल्यात सुनील म्हात्रें यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्यांना शिवीगाळ करून पुन्हा ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. जखमी अवस्थेत आकाश म्हात्रे व किशोर खुंटारकर यांनी त्यांना उपचारासाठी कल्याण-शिळ मार्गावरील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

मात्र धक्कादायक बाब म्हणजे उपचार सुरू असतानाच बाबुराव पाटील, शिवसेना उप तालुका प्रमुख रोहिदास म्हात्रे, चेतन म्हात्रे, राम म्हात्रे, विकास आणि अन्य काही जणांनी रुग्णालयात प्रवेश करून सुनील म्हात्रे व त्यांचे बंधू विनोद यांना पुन्हा मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या झालेल्या हल्ल्यात विनोद यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली. तसेच रोहिदास म्हात्रे यांनी संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे.

या सर्व प्रकरणामागे नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीतील राजकीय वैमनस्य कारणीभूत असल्याची चर्चा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रंगली आहे.

म्हात्रे कुटुंबीयांनी भाजप उमेदवाराला सहकार्य केल्याने शिंदे गटाशी संबंधित उमेदवाराचा पराभव झाला होता. दरम्यान त्याचाच राग मनात धरून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप जखमी कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान त्यामुळे ग्रामीण भागात भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दोषींवर कठोर कारवाईची मागणी

रस्त्यावर हल्ला करूनही समाधान न मानता रुग्णालयात घुसून जखमींना मारहाण केल्याच्या आरोपामुळे ग्रामीण भागात संतापाची लाट उसळली आहे. राजकीय पाठबळामुळे आरोपींना संरक्षण मिळत असल्याचा आरोपही जखमी सुनील म्हात्रें यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा निष्पक्ष व सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

हल्ल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांच्या हाती

या घटनेची गंभीर दखल घेत शिळ-डायघर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली असून गुन्ह्यातील आरोपींची संख्या 15 पर्यंत पोहोचल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. हल्ल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांच्या हाती लागले असून पडले नाका परिसरातील तसेच रुग्णालयातील घटनांचे दृश्य पुरावे तपासात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT