

डोंबिवली: कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी देवीचे मंदिर आणि ईदगाहसमोरील रस्त्यावर नमाज पठणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. बकरी ईदच्या दिवशी मंदिर प्रवेशबंदीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हिंदुत्ववादी संघटना, भाजपा, तसेच शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाने दुर्गाडी देवीच्या मंदिरात भाविकांना प्रवेश देण्याची मागणी करत रस्त्यांवरील नमाज पठणाला विरोध दर्शविला आहे. बकरी ईदच्या दिवशी नमाज पठण, मंदिर प्रवेशबंदी आणि विविध संघटनांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते आणि परिस्थिती कशी हाताळते, याकडे आता कल्याणकरांच्या नजरा लागल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी विविध राजकीय पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत चर्चा केली. येत्या बुधवारी 27 मे रोजी बकरी ईद साजरी होणार आहे.
दुर्गाडी किल्ला परिसरातील ईदगाहसमोर मुस्लिम बांधव नमाज अदा करतात. त्याच परिसरात दुर्गाडी देवीचे मंदिर असल्याने नमाज पठणाच्या कालावधीत मंदिरात भाविकांच्या प्रवेशावर काही काळ निर्बंध घालण्यात येतात. या निर्णयाच्या विरोधात शिवसेनेकडून गेल्या अनेक वर्षांपासून घंटानाद आंदोलन केले जात आहे. यंदा भाजपानेही हा मुद्दा आक्रमकपणे उचलून धरला आहे.
भाजपा नेते आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांना निवेदन देत रस्त्यावरील नमाज पठण थांबवावे तसेच दुर्गाडी मंदिरावरील प्रवेशबंदी हटवावी, अन्यथा बकरी ईदच्या दिवशी हनुमान चालीसा आणि दुर्गा स्तोत्र पठण आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या कार्यालयात हिंदुत्ववादी संघटना, शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांनी आपापली भूमिका मांडत प्रत्येक धर्माला समान अधिकार मिळाले पाहिजेत, मात्र हिंदू भाविकांवरच निर्बंध का लादले जातात, असा सवाल उपस्थित केला.
यावेळी शिवनेच्या शिंदे गटाचे शहरप्रमुख रवी पाटील यांनी हिंदू भाविकांना मंदिरात दर्शनाचा अधिकार मिळाला पाहिजे, अशी भूमिका मांडली. याच दरम्यान या मुद्द्यावर ठाकरे गटाने भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली.
केंद्र आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार असतानाही हिंदूंना मंदिरात प्रवेश मिळत नाही. त्याच सरकारमधील पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा द्यावा लागत आहे, ही बाब लज्जास्पद आणि हास्यास्पद असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी यांनी केला आहे.
आमचा कोणत्याही धर्माला विरोध नाही : शिवसेनेची भूमिका
यासंदर्भात शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले, आमचा कोणत्याही धर्माला विरोध नाही. मुस्लिम बांधवांनी ईद साजरी करावी, नमाज पढावा. पण रस्त्यावर नमाज पठण करून वाहतूक कोंडी करू नये. ईदगाह मैदानातच नमाज पठण व्हावे. दुर्गाडी देवीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या हिंदू भाविकांना बकरी ईदच्या दिवशी मंदिरात प्रवेशबंदी करणे चुकीचे आहे.
वर्षभरात एकच दिवस ईद असते, पण भाविकांचे श्रद्धास्थान रोजच खुले असले पाहिजे, असाही मुद्दा पाटील यांनी उपस्थित केला. प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी. पण सरसकट मंदिर बंद करणे मान्य नाही. हिंदूंच्या सणाला रस्ते बंद होतात, मग आमच्या मंदिर प्रवेशावर बंदी का ? असाही सवालही त्यांनी उपस्थित केला.
दुर्गाडी...अस्मितेचा प्रश्न आणि प्रशासनाची कोंडी
दरवर्षी ईदच्या दिवशी दुर्गाडी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला जातो. दोन्ही समाजाच्या धार्मिक भावना लक्षात घेता प्रशासनाची कोंडी होते. एकीकडे कायदा आणि सुव्यवस्था, तर दुसरीकडे धार्मिक श्रद्धा यांचा समतोल साधताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. शिवसेनेने हा मुद्दा उचलून धरल्यानंतर कल्याणच्या राजकारणात पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
भाजपा, मनसे व इतर पक्ष या संदर्भात काय भूमिका घेणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. बकरी ईद अवघ्या दोन दिवसांवर आली असताना प्रशासन यावर काय तोडगा काढते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुर्गाडी मंदिर खुले राहणार की बंद ? याचा निर्णय पोलिस व जिल्हा प्रशासनाच्या बैठकीनंतर होईल.