Document Verification Hawkers Kalyan  Pudhari
ठाणे

Kalyan Hawkers Action | कल्याणात फेरीवाल्यांवर पोलिसांची कारवाई; कागदपत्रांची तपासणी, शंभराहून अधिक जण ताब्यात

रेल्वे स्थानकापासून १५० मीटरच्या परिसरातील रस्ते आणि फुटपाथ बळकावणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

Document Verification Hawkers Kalyan

डोंबिवली : रेल्वे स्थानकापासून १५० मीटरच्या परिसरातील रस्ते आणि फुटपाथ बळकावणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर ॲड. हर्षाली थविल-चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांनी दिले आहेत. त्यानुसार महापालिकेसह पोलिस प्रशासनानेही कारवाईची मोहीम सुरू केली असून रस्ते आणि पदपथ मोकळे करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

या मोहिमेदरम्यान पोलिसांनी आपल्या हद्दीतील फेरीवाल्यांच्या आधारकार्ड, पॅनकार्ड, तसेच वास्तव्याच्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. या कारवाईमुळे परप्रांतीय फेरीवाल्यांसह बांग्लादेशी घुसखोरांवरही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलिस उपायुक्त अतुल झेंडे आणि कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी फेरीवाल्यांविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांनी या कारवाईला विशेष वेग दिला आहे.

महापालिकेनंतर पोलिसांनीही आक्रमक भूमिका घेतल्याने कल्याण-डोंबिवली परिसरातील फेरीवाल्यांमध्ये खळबळ उडाली आहे. केडीएमसीच्या विविध प्रभागांमध्ये कारवाई सुरू असली तरी अनेक ठिकाणी रस्ते, चौक आणि फुटपाथवर हातगाड्या, ठेले व टपऱ्यांनी अतिक्रमण केल्याचे चित्र आहे. विशेषतः कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रस्ते व पदपथ बळकावून फेरीवाले व्यवसाय करत असल्याचे आढळून आले.

या पार्श्वभूमीवर खडकपाडा पोलिस ठाण्याच्या गोपनीय शाखा आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेने संयुक्त कारवाई करत फेरीवाल्यांची कागदपत्रे तपासण्यास सुरुवात केली. पोलिसांची कारवाई सुरू होताच काही फेरीवाल्यांनी पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली. या मोहिमेत सुमारे १०० हून अधिक फेरीवाल्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, अनेक फेरीवाल्यांकडे ओळखपत्र, आधारकार्ड किंवा वास्तव्याचे पुरावे नसल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांची नाव, मूळ गाव, सध्याचे वास्तव्य आदी माहिती पोलिसांकडून तपासली जात आहे. तसेच त्यांच्यावर इतर पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंद आहेत का, याचीही पडताळणी सुरू आहे.

चौकशीदरम्यान काही जण बांग्लादेशी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या विरोधात बेकायदेशीर वास्तव्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT