Kalyan Police Action
डोंबिवली : जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण परिमंडळ -३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या साह्याने नावाप्रमाणे अतुलनीय कामगिरी करून महाराष्ट्र पोलिस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. कल्याणच्या या बहाद्दर पोलिसांनी आंतरराज्यिय गांजा तस्करांचा कणा मोडून काढला आहे. अहोरात्र परिश्रम करणाऱ्या पोलिसांच्या पथकाने विशाखापट्टणम् च्या गर्द झाडी असलेल्या जंगलात घुसून उचलेल्या खूँखार बदमाशांना कोठडीचा रस्ता दाखविला असून या टोळीकडून आतापर्यंत ११५ किलो गांजा, गुन्ह्यात वापरलेली वाहने, वॉकी-टॉकी आणि अग्निशस्त्रांसह ७० लाख ३ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे. जिल्ह्यातील ही सर्वांत मोठी कारवाई मानली जाते. या सर्व बदमाशांच्या कल्याण, सोलापूर आणि आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम् भागातून मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
बाबर उस्मान शेख (२७), गुफरान हनान शेख (२९), सुनिल मोहन राठोड (२५), आझाद अब्दुल शेख (५५), रेश्मा अल्लावुददीन शेख (४४), शुभम उर्फ सोन्या शरद भंडारी (२६), सोनू हबीब सय्यद (२४), आसिफ अहमद अब्दुल शेख (२५), प्रथमेश हरीदास नलवडे (२३), रितेश पांडुरंग गायकवाड (२१), अंबादास नवनाथ खामकर (२५), आकाश बाळू भिंताडे (२८), आणि योगेश दत्तात्रय जोध (३४), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
कल्याण-डोंबिवलीच्या शहर परिसरात तस्करी करून आणलेल्या अंमली पदार्थांची चोरीछुपे विक्री आणि वितरण करणाऱ्या बदमाशांचे पेकाट मोडण्यासाठी विडा उचललेल्या डीसीपी अतुल झेंडे यांनी खास पथकाची निर्मिती केली आहे. कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे, खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक मारूती आंधळे, पोलिस निरीक्षक साबाजी नाईक, कोळसेवाडीचे सहाय्यक निरीक्षक अनिल गायकवाड, विजय गायकवाड, संदिप भालेराव, उपनिरीक्षक जितेंद्र ठोके, हवालदार सदाशिव देवरे, राजू लोखंडे, संदिप भोईर, योगेश बुधकर, निसार पिंजारी, सुरज खंडाळे, अनिल खरसान, राहुल शिंदे, अमित शिंदे, खुशाल नेरकर, कांतीलाल वारघडे, अनंत देसले, सुरेश खंडाळे या पथकाने सर्वप्रथम आंबिवली रेल्वे स्टेशन ते बनेली रोड परिसरातून तिघांच्या मुसक्या आवळल्या.
या त्रिकुटाकडून गांजा, गुन्ह्यात वापरलेले वाहन व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. कस्सून चौकशी केली असता या त्रिकुटाने तोंड उघडले. अंमली पदार्थांचे स्त्रोत परराज्यातील असल्याची माहिती मिळताच पथकाने वेळ न दवडता आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम् कडे धाव घेतली. त्या भागातील गर्द झाडीच्या जंगल पट्ट्यात शोध मोहीम राबवून तेथील पोलिसांच्या साह्याने कल्याणच्या बहाद्दर पोलिसांनी जीवाची पर्वा न करता १० सशस्त्र बदमाशांना जेरबंद केले. या बदमाशांकडून अंमली पदार्थांसह गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहने, मोबाईल, रोख रक्कम तसेच प्राणघातक अग्नीशस्त्रे जिवंत काडतूसे, इतकेच काय तर मोबाईलचे नेटवर्क बंद पडल्यानंतर एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वॉकीटॉकी देखिल पोलिसांनी हस्तगत केल्या.
११५ किलो वजनाचा २८ लाख ७५ हजार रूपये किंमतीचा गांजा एक पिस्तूल, २ जिवंत काडतुसे, चार्जर्ससह २ वॉकी-टॉकी संच, २ कार, १ रिक्षा, १ बुलेट, १ स्कूटर, रोख रक्कम असा ७० लाख ३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले.