Kalyan Murder Case Pudhari
ठाणे

Kalyan Murder Case: कल्याण हादरले : वालधुनी पुलाखाली फेकलेला मृतदेह; सासू-मित्रानेच सुनेचा खून

ग्रॅच्युईटी व अनुकंपा नोकरीच्या वादातून हत्या; 24 तासांत पोलिसांनी उलगडा करत दोघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

खूनाचा छडा लावणाऱ्या पोलिसांनी तपास करून लताबाई नाथा गांगुर्डे (60, रा. श्रीनिवास चाळ, न्यू जिम्मीबाग, कर्पेवाडी, कोळसेवाडी, कल्याण-पूर्व) आणि लताबाईचा मित्र जगदीश महादेव म्हात्रे (67, रा. वरपगाव, कल्याण) यांना अटक केली आहे. तर रूपाली विलास गांगुर्डे (35) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून ती लताबाई हिची सून होती.

डोंबिवली : भारतीय रेल्वे सेवेमध्ये नोकरी करणाऱ्या पतीचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाल्यानंतर पत्नीला 10 लाखांची अंशदानाची (ग्रॅच्युईटी) रक्कम मिळाली. तसेच, मयत पतीच्या जागेवर आपल्याला नातवाला तेथे अनुकंंपा तत्वावर नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करू, असे सासूचे मत होते. मात्र त्याऐवजी सूनेने स्वत:साठी रेल्वेत अनुकंपा तत्वावरील नोकरीसाठी अर्ज केला होता. यावरून आणि आपल्या मुलाच्या पश्चात त्याच्या अंशदानाच्या रकमेतील काही रक्कम देण्यासाठी सून नकार देत होती. या रागातून सासूने आपल्या मित्राच्या साह्याने दोन दिवसांपूर्वी कल्याण पूर्वेत जिम्मीबाग, कर्पेवाडी भागात राहत्या घरात सुनेचा खून केला. या खुनाचा उलगडा महात्मा फुले चौक पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत केला.

वालधुनी रेल्वे पुलाखाली एक महिलेचा खून करून तिला बेवारस स्थितीत टाकून देण्यात आल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी महात्मा फुले चौक पोलिसांना शुक्रवारी दिली. पोलिसांनी तात्काळ तपास चक्रांना वेग दिला होता. हा तपास सुरू असताना लताबाई गांगुर्डे महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात आल्या. त्यांनी गुरूवारी रात्री आठ वाजल्यापासून आपली सून रूपाली ही रामबाग येथील घरातून निघून गेली आहे. ती घरी परतली नसल्याची माहिती दिली. तिने पोलिसांना सुनेची प्रतिमा पोलिसांना दाखवली. ती मयत महिलेच्या चेहऱ्याशी मिळतीजुळती होती. मात्र या सगळ्या प्रकारावरून पोलिसांचा लताबाईवर संशय बळावला. पोलिसांनी लताबाईला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरू केली.पोलिसांनी लताबाईंची चौकशी केली. या चौकशीत धक्कादायक माहिती पुढे आली. लताबाईंचा मुलगा विलास गांगुर्डे भारतीय रेल्वेत नोकरीला होता. तो सप्टेंबर 2025 मध्ये मरण पावला.

मुलाच्या मृत्युनंतर सून रूपाली हिला 10 लाखाचे अंशदान मिळाले. विलासच्या जागेवर त्याचा मुलगा वंश यास आपण नोकरीला लावू, असे सासू लताबाईंचे मत होते. पण रूपालीने सासूचे न ऐकता स्वत:साठी अनुकंपा तत्वावरील नोकरीसाठी रेल्वेकडे अर्ज केला होता. या विषयांवरून लताबाई आणि रूपाली यांच्यात वाद सुरू होता. तसेच पतीची अंशदानाची रक्कम रूपाली सासू लताबाईला देत नव्हती. त्यामुळे लताबाई आणि तिचा मित्र जगदीश म्हात्रे यांनी रूपालीचा काटा काढण्याचे कारस्थान रचले.

गुरूवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास लताबाई आणि जगदीश यांनी रूपाली ही कर्पेवाडीतील घरात असताना तिच्या डोक्यात लोखंडी सळईने प्रहार करून तिला जागीच ठार मारले. मध्यरात्रीच्या वेळेत तिचा मृतदेह वालधुनी रेल्वे पुलाखाली फेकून दिला. मात्र पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून या खुनाला अवघ्या 24 तासांतच वाचा फोडली.

पोलिस निरीक्षक विजय नाईक यांनी दिलेल्या सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीनुसार लताबाई आणि जगदीश यांच्या विरूध्द खुनाचा गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलरामसिंग परदेशी, पोलिस निरीक्षक विजय नाईक, उपनिरीक्षक हिम्मत पवार, दिलीप जाधव आणि त्यांच्या पथकाने या तपास प्रकरणात महत्वाची कामगिरी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT