Kalyan Metro Project pudhari photo
ठाणे

Kalyan Metro Project : आठ वर्षांनंतर पुन्हा होणार कल्याण-मेट्रोचे भूमिपूजन

मेट्रो ५-अ मार्ग बदलाला राज्य सरकारची मंजुरी; कल्याण मेट्रो कामाला प्रत्यक्षात सुरुवातच नाही; जानेवारीत सुरुवात होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

मुंब्रा : मेट्रो ५ प्रकल्पातील कल्याण टप्प्याचे काम अद्याप सुरू झाले नव्हते. मात्र मेट्रो ५- अ च्या मार्गबदलाला अधिकृत मंजुरी देत अतिरिक्त निधीला मान्यता मिळाल्याने पुन्हा एकदा भूमिपूजन करण्यात येत आहे. कल्याण मेट्रोसाठी ४,०६३ कोटींच्या अतिरिक्त निधी तसेच मेट्रोच्या कामाला जानेवारीत सुरुवात होण्यााची शक्यता आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो प्रकल्पांच्या भूमिपूजनाचा प्रारंभ ज्या कल्याण शहरातून झाला, त्याच कल्याण मेट्रोच्या कामाला अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आठ वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या मेट्रो ५ प्रकल्पातील कल्याण टप्प्याचे काम अद्याप प्रत्यक्षात सुरू झाले नव्हते. मात्र, राज्य सरकारने मेट्रो ५-अच्या मार्ग बदलाला अधिकृत मंजुरी देत अतिरिक्त निधीलाही मान्यता दिल्याने या प्रकल्पाचे पुन्हा एकदा भूमिपूजन होणार आहे.

‘या कामासाठी लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार असून जानेवारीत कामाचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे,’ अशी माहिती शिवसेना कल्याण शहरप्रमुख रवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मेट्रो प्रकल्पातील अडथळे दूर करण्यासाठी तसेच, मार्ग निश्चितीसाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई आणि उपनगरातील विविध मेट्रोमार्ग मंजूर झाल्यानंतर २०१८मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते कल्याण येथे या प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर मागील आठ वर्षांत मुंबई आणि नवी मुंबईकर आणि मिरा-भाईंदरमधील प्रवाशांनी मेट्रो प्रवासाचा अनुभव घेतला; मात्र कल्याण मेट्रोचे काम प्रत्यक्षात सुरू झाले नाही. त्यामुळे कल्याणकरांची प्रतीक्षा वाढतच होती.

ठाणे ते कल्याण मेट्रोचा मूळ मार्ग दुर्गाडी चौकातून लालचौकीमार्गे एपीएमसी मार्केट असा निश्चित करण्यात आला होता. मात्र, हा मार्ग संपूर्ण कल्याण शहराच्या दृष्टीने सोयीचा ठरणार नाही, अशी भूमिका स्थानिकांकडून मांडण्यात आली होती. दुर्गाडी-खडकपाडा-बिर्ला कॉलेज-कल्याण स्टेशनमार्गे पुढे मेट्रो १२ला जोडणारा मार्ग असावा, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील तसेच एमसीएचआय संघटनेकडून करण्यात आली होती. या प्रस्तावित मार्गबदलासाठी तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.

ठाणे-धामणकर नाका चाचणी

या नव्या मार्गासाठी लागणाऱ्या ४,०६३ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीस मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रो ५-अ मार्गबदलाचा मार्ग मोकळा झाला असून, कल्याण मेट्रो प्रत्यक्षात साकारण्याची शक्यता बळावली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदाराला कार्यादेश दिल्यानंतर जानेवारीत कामाचे भूमिपूजन केले जाईल, असे पाटील यांनी सांगितले.

ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गासह पुढे उल्हासनगर-अंबरनाथ- चिखलोलीपर्यंत जाणाऱ्या मेट्रो मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे. यापैकी ठाणे-भिवंडी मार्गाचे काम सुरू झाले असून ठाणे ते धामणकर नाका या ११.९ किमी लांबीच्या आणि सहा स्थानकांच्या मेट्रो मार्गाची मंगळवारी चाचणी घेण्यात आली.

मेट्रो मार्ग भूमिगत करण्याचा निर्णय

  • भिवंडीतील रहिवासी आणि व्यापाऱ्यांकडून मेट्रोमुळे होणाऱ्या बाधांवरून विरोध झाल्याने धामणकर नाका ते दुर्गाडीदरम्यानच्या १०.४८ किमी मार्गात बदल करण्यात आला.

  • राजीव गांधी चौक ते टेमघर या सुमारे तीन किमी भागात मेट्रो मार्ग भूमिगत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या नव्या आराखड्याला शासनमान्यता मिळाली आहे.

  • त्यामुळे अनेक वर्षे रखडलेल्या कामाला वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

  • मेट्रो ५-अ अंतर्गत दुर्गाडी-खडकपाडा-भोईरवाडी-कल्याण-उल्हासनगर असा ११.९३ किमीचा मार्ग प्रस्तावित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT