ठाणे : कल्याणमध्ये रिक्षाचालकांच्या मनमानी कारभारामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. जवळचे भाडे नाकारताना प्रवाशांकडून अवाच्या सव्वा भाडे घेऊन लूट केली जात आहे. याविरोधात प्रवाशांनी आरटीओकडे मीटरप्रमाणे रिक्षा सुरू करण्याची मागणी लावून धरली होती. अखेर कल्याणच्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कल्याण (पश्चिम) रेल्वे स्टेशन येथे मीटरप्रमाणे रिक्षा वाहतूक (पहिला टप्पा) 18 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे प्रवाशांनी स्वागत केले आहे.
कल्याण उपप्रादेशिक कार्यालयाने याबाबत कल्याण (पश्चिम) या विभागातील ऑटोरिक्षा संघटनांना कळवून मीटर प्रमाणे रिक्षा भाडे घेण्याचे आवाहन केले आहे. त्यास रिक्षा चालक कसे प्रतिसाद देतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच लांबच्या प्रवाशांकडूनही मीटर रिक्षाला दिला जाणार प्रतिसाद देखील या निर्णयाला बळ देणारे ठरू शकतो, अन्यथा पुन्हा शेअर रिक्षाच सुरु राहू शकेल.
ठाण्यासह डोंबिवलीमध्ये शेअर रिक्षासह मीटर रिक्षा सुरु आहे. ठाणे स्थानकात मीटर रिक्षानेच प्रवाशी प्रवास करतात. त्यातून जवळचे भाडे नाकारण्याच्या घटना नगण्य झाल्या आहेत. उलट कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर गेल्यानंतर मीटर रिक्षाने कुणी येण्यास तयार होत नाही. जोपर्यंत शेअर रिक्षा भरली जात नाही तोपर्यंत प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागते. तातडीचे कामासाठी जायचे असल्यास रिक्षाचालक हे नियमित भाड्यापेक्षा दुप्पट भाडे घेत असतात.
एकप्रकारे प्रवाशांची आर्थिक पिळवणूक केली जाते. त्यातून प्रवाशी आणि रिक्षा चालकांमध्ये वाद झालेले दिसून येतात. सर्व रिक्षा ह्या ठरलेल्या मार्गावर धावत असल्याने जवळचा तसेच दुसऱ्या मार्गाकडे जाण्यास रिक्षा चालक नकार देतात. त्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागतो. यासंदर्भात वारंवार तक्रारी झाल्यानंतर अखेर उपप्रादेशिक विभागाने कल्याण रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडून पहिल्या टप्प्यात मीटरने रिक्षा प्रवास सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्या रिक्षा चालकांनी भाडे नाकारले तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. हा मीटर रिक्षा प्रवास 18 नोव्हेम्बर सकाळी 11 वाजता सुरु होईल. त्यावेळी सर्व ऑटोरिक्षा संघटनाचे पदाधिकारी तसेच संघटनाचे सभासद यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे तसेच जास्तीत जास्त प्रवाशांना मीटरप्रमाणे रिक्षा प्रवास करण्याबाबत प्रोत्साहित करावे, असे आवाहन कल्याणचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी केले आहे.