डोंबिवली : कल्याण-मलंग रोडला शनिवार/रविवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास ये-जा करणाऱ्या प्रवाशांसह पादचारी आणि वाहनचालकांमध्ये दहशत माजविणाऱ्या कोयताधारी गुंडाला कोळसेवाडी पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. पोलिसांनी शोध घेऊन मुमताज रवाबअली खान याची घरापासून पोलिस ठाण्यापर्यंत धिंड काढण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील गुंड-गुन्हेगारांची पाचावर धारण बसली आहे.
शनिवार/रविवारच्या मध्यरात्री या रस्त्यावर अवतरलेला बदमाश झिंगलेल्या अवस्थेत हातात धारदार सुरा आणि कोयत्याचा धाक दाखवून ये-जा करणाऱ्या वाहनांना थांबवून धमक्या देत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. ट्रक चालकांना शस्त्रांचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या या बदमाशाचा शोध घेऊन त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सूचना दिल्या.
त्यानुसार कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने शोध सुरू केला. सदर इसमाची ओळख रेकॉर्डवरील आरोपी मुमताज रवाबअली खान असल्याचे आढळून आले. हा गुंड कल्याण-मलंग रोडला असलेल्या पिसवली गावातील अमरदीप कॉलनीत राहणारा असल्याचे समोर आले.
पोलिसांच्या पथकाने मुमताज खान याला त्याच्या राहत्या घरापासून पोलिस ठाण्यापर्यंत दोरीने बांधून नेले. त्याच्याविरूद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२६ (२), भारतीय हत्यार कायदा ४/२५, महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम ३७ (१) १३५ सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी कायदा, शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. मात्र समाजविघातक कृत्य करताना कुणीही आढळून आल्यास त्याची गय केली जाणार नसल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत गुरव यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना सांगितले.