

डोंबिवली : काय रे...महाराष्ट्रात राहता आणि मराठी बोलता येत नाही का ? असा जाब विचारत एका नेपाळी आणि इतर दोन परप्रांतीयांना चौघा जणांनी मिळून बेदम ठोकून काढले. हा प्रकार रविवारी रात्रीच्या सुमारास कल्याण पूर्वेकडील चक्कीनाक्यावर असलेल्या संतोषनगर परिसरात घडला. या मारहाणीत तिन्ही परप्रांतीय गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
या मारहाणीत जखमी झालेल्या विष्णू थापा याने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दाखल केला आहे. सदर तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, मी आणि माझे सहकारी कल्याण पूर्वेतील चक्कीनाका संतोषनगर भागात रिध्दी भोजनालय येथे आचारी म्हणून काम करतो. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी इसम वडा-पाव खाण्यासाठी भोजनालयात आले. वडा-पाव खाऊन झाल्यानंतर ते दुकानातून निघून गेले. थोड्या वेळानंतर दोन्ही इसम पुन्हा आले. महाराष्ट्र राहून मराठी बोलता येत नाही का ? असा आपल्याला प्रश्न विचारला. यावर काही बोलण्याच्या आत आपणास शिवीगाळ करत त्या दोघांनी आपल्या नाकावर ठोसा-बुक्क्याने मारहाण केली.
त्यामुळे नाकाचा घोळणा फुटून गंभीर दुखापत झाली. आपणास मारहाण केल्यानंतर दोन्ही इसम तेथून निघून गेले. मात्र थोड्यावेळाने दोघे इसम त्यांच्या अन्य साथीदारांसह परत आले. मराठीचा मुद्दा उपस्थित करून त्या चौकडीने पुन्हा आपणास मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी आपला एक सहकारी मदन थापा दुकानात काम करत होता. त्याला दुकानातील मिळेल त्या वस्तूने मारहाण केली. एकाने फरशीचा तुकडा डोक्यात घालून मदनला दुखापत केली. आपले अन्य सहकारी अली खान याचा मोबाईल फरशीवर आपटून तो फोडून टाकण्यात आला. त्या चौघांनी आपल्या दुकानात उच्छाद मांडला होता. ग्राहकांसाठी विक्रीसाठी तयार केलेल्या जेवणाची नासधूस केली केली. दुकानातील भांडी बाहेर फेकून दिली. बराच उशीर हे इसम दुकानात गोंधळ घालत होते. त्यानंतर चौघेही तेथून निघून गेल्याचे विष्णू थापा याने त्याच्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.