डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या निवासस्थानासमोरच अनोखे आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले Pudhari
ठाणे

Kalyan Protest | कल्याणात अनोखे आंदोलन : केडीएमटीच्या महिला कर्मचाऱ्यांनी बांधली आयुक्त बंगल्याच्या प्रवेशद्वाराला राखी

सणासुदीला पगार कापल्याने मनसेच्या नेतृत्वाखाली केडीएमटीच्या कर्मचाऱ्यांचा एल्गार

पुढारी वृत्तसेवा

Kalyan KDMT Women Employees Protest

डोंबिवली : सणासुदीच्या काळातच परिवहन कर्मचाऱ्यांच्या वेतनाला कात्री लावल्याने संतप्त झालेल्या केडीएमटीच्या महिला कर्मचाऱ्यांनी मनसेच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी थेट कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या निवासस्थानासमोरच अनोखे आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले.

सणासुदीला पगार कापल्याने मनसेच्या नेतृत्वाखाली केडीएमटीच्या कर्मचाऱ्यांनी एल्गार केला. आयुक्तांचा मुखवटा घालून निषेध करणाऱ्या आंदोलनकर्त्यांनी बंगल्यासमोर राडा केला.

सणासुदीच्या काळात वेतनात कपात करण्यात आल्याने प्रचंड नाराज झालेल्या केडीएमटीच्या ठेका महिला परिवहन कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वाखाली अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. या आंदोलनाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या नेतृत्वाखाली संतप्त कर्मचाऱ्यांनी थेट केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या निवासस्थानासमोर जोरदार निदर्शने केली आणि बंगल्याच्या प्रवेशद्वारालाच राखी बांधून प्रशासनाचे लक्ष आपल्या न्याय्य मागण्यांकडे वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनादरम्यान काही कर्मचाऱ्यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांचा मुखवटा परिधान करून सांकेतिक पद्धतीने आपला तीव्र विरोध देखील व्यक्त केला.

सणासुदीच्या दिवसांमध्ये ठेका महिला परिवहन कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यात आली असून त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली असल्याचा गंभीर आरोप मनसेने केला. आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी कापलेले वेतन तात्काळ आपल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची जोरदार मागणी केली.

मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी प्रशासनाला आणि संबंधित ठेकेदाराला अत्यंत कडक शब्दांत इशारा देताना सांगितले की, जर कर्मचाऱ्यांचे कापलेले वेतन लवकरात लवकर त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले नाही. तर संबंधित ठेकेदाराच्या विरोधात आणखी तीव्र आणि आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल.

या अनोख्या राखी आंदोलनामुळे महापालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. सणासुदीच्या काळात वेतनात केलेली ही कपात कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, असा निर्धार कर्मचाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT