

डोंबिवली : धावत्या मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये घुसून महिला प्रवाशांचे दागिने लांबवणाऱ्या दोन सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात कल्याण लोहमार्ग क्राईम ब्रँचला मोठे यश आले आहे. दीपक चव्हाण आणि भोला चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. महिला प्रवाशांना लक्ष्य करणारी ही सराईत जोडगोळी गजाआड झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
कल्याण रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेनंतर प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. या दोन्ही चोरट्यांच्या हालचाली रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या होत्या. या फुटेजच्या आधारे क्राईम ब्रँचने त्यांचा कसून शोध सुरू केला होता.
दरम्यान, हे दोन्ही चोरटे चोरीच्या पैशांतून मौजमजा करण्यासाठी कल्याण स्थानकासमोरील एका नामांकित हॉटेलमध्ये ओली पार्टी करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी हॉटेल परिसरात तात्काळ सापळा रचला. दोन्ही आरोपी मद्यधुंद आणि बेसावध अवस्थेत असताना पोलिसांनी शिताफीने झडप घालून त्यांना बेड्या ठोकल्या.
सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या चोरट्यांनी पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली. या जोडगोळीने यापूर्वी लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये अशा प्रकारे किती प्रवाशांना लुटले आहे आणि त्यांच्याकडून किती मुद्देमाल हस्तगत होऊ शकतो, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या चौकशीतून आणखी अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.