Ambivli Railway Station Fatka Gang
डोंबिवली : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली रेल्वे स्थानकाजवळ फटका टोळीने एका तरूणाचा मोबाईल लांबविला. मात्र मोबाईल परत मिळविण्यासाठी या तरूणाने जीवाची पर्वा न करता धावत्या एक्स्प्रेसमधून रेल्वे मार्गावर उडी मारून चोरट्यांचा पाठलाग केल्याने त्याच्या धाडसाचे पोलिसांसह सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
या प्रकरणी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील आटकवडे गावाचा रहिवासी असलेला महाविद्यालयीन विद्यार्थी परमानंद शांताराम आव्हाड (वय २१) याने कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
मुंबईतील घाटकोपर येथे राहणाऱ्या मित्राच्या वाढदिवसासाठी परमानंद नाशिक रोडहून राज्यराणीने मुंबईकडे येत होता. टिटवाळ्यानंतर तो दारात मोबाईल हातात घेऊन उभा असताना आंबिवलीजवळ उड्डाणपुलाखाली दबा धरून बसलेल्या चोरट्यांनी त्याच्या हातावर काठी मारली, मोबाईल खाली पडताच तिघांनी तो उचलून पळ काढला. परमानंदने आरडाओरड करत एक्स्प्रेसचा वेग कमी होताच थेट रेल्वे मार्गावर उडी मारून त्यांचा पाठलाग केला.
मात्र, तोपर्यंत तिन्ही चोरटे त्यांच्या एम एच ०५ जीजी १९१६ क्रमांकाच्या दुचाकीवरून पसार झाले. या पाठलागात परमानंदचा पाय मुरगळला आणि हाताला दुखापत झाली. त्यानंतर त्याने रिक्षाने कल्याण लोहमार्ग पोलिस ठाणे गाठून बेतलेला प्रसंग कथन केला. पोलिसांनी परमानंदच्या धाडसाचे कौतुक केले. त्याच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे.
जामिनावर सुटताच गोरखधंदे सुरू
गेल्या अनेक वर्षांपासून फटका टोळी टिटवाळ्यापासून आंबिवली ते शहाड स्थानकांदरम्यान सक्रिय आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांतून दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातातील मौल्यवान वस्तू लांबविण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. काठीचा फटका मारून प्रवाशांची लूट करणाऱ्या या टोळीचे अनेक बदमाश लोहमार्ग पोलिसांनी पकडले आहेत. मात्र जामिनावर बाहेर आले की ते पुन्हा आपले गोरखधंदे सुरू करत असल्याचे दिसून येते.