KDMT Ticket Checker Assaulted Pudhari
ठाणे

Kalyan Crime | मारहाणीत जखमी, केडीएमटीच्या तिकीट निरीक्षकाला तक्रारीसाठी पाच तास प्रतीक्षा; खडकपाडा पोलिसांच्या कारभारावर सवाल

कल्याणच्या खडकपाडा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, जनार्दन पाटील मारहाण प्रकरणी एका कुटुंबातील आठ जणांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

KDMT Ticket Checker Assaulted

डोंबिवली : मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याऐवजी पोलिस ठाण्यातच तब्बल पाच तास वाट पहायला लावल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये समोर आला आहे. कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्याची कार्यपद्धती पुन्हा एकदा प्रश्नांच्या घेऱ्यात सापडली आहे.

बारावे गावात शेजाऱ्यांसोबत झालेल्या वादात जखमी झालेल्या केडीएमटी परिवहन विभागाचे तिकीट निरीक्षक जनार्दन एकनाथ पाटील यांना आपली तक्रार दाखल करायला तासन्तास वाट पाहावी लागली. पोलिसांच्या टाळाटाळीमुळे संतापलेल्या जनार्दन पाटील यांनी अखेर पोलिस ठाण्यातच आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवरून चर्चा अधिकच रंगली आहे. जखमी माणसाला उपचारानंतरही न्यायासाठी झगडावे लागते, हीच बाब सर्वसामान्यांमध्ये संतापाचा विषय बनली आहे.

पोलिसांत दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, बारावे गावातील साईनाथ कोळीवाडा येथे राहणारे जनार्दन पाटील २४ नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे कर्तव्यावर गेले होते. दिवसभर काम आटोपून ते घरी परतणार होते. पण सायंकाळी सुमारे सात वाजता त्यांच्या पत्नीने दूरध्वनी करून सांगितले की शेजाऱ्यांसोबत वाद झाला आहे आणि त्यांना तातडीने घरी येण्यास सांगितले. पत्नीचा फोन येताच पाटील काळजीत पडले आणि त्यांनी तातडीने सायकलने घराकडे प्रवास सुरू केला. रात्री सुमारे ८.४५ वाजता कालिका माता मंदिराजवळ शिवशक्ती पाडा परिसरात काही लोकांनी त्यांना अडवले. गजानन ढोणे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पाटील यांना अडवून वाद सुरू केला. तुला खूप अहंकार आला आहे का ? असे म्हणत त्यांच्याशी शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. एकट्या माणसाला घेरून मारहाण करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

लोखंडी रॉडने डोक्यावर वार करण्यात आला. गजानन ढोणे यांची पत्नी रंजना ढोणे, त्यांच्या मुली विद्या कोनकर आणि वनिता, विनायक ढोणे तसेच भालचंद्र मिरकुटे, त्यांची पत्नी कविता मिरकुटे, निशा मिरकुटे आणि त्यांची मुले चिन्मय व नेवाली यांनी मिळून जनार्दन पाटील यांना बेदम मारहाण केली. यावेळी विनायक ढोणे याने लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर प्रहार करून त्यांना जखमी केले. डोक्यावर वार झाल्याने पाटील रक्तबंबाळ झाले. हल्लेखोरांच्या मारहाणीत जखमी झालेले पाटील कसेबसे तेथून निसटून खडकपाडा पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणी आणि उपचारांसाठी केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात पाठवले. उपचारानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन हल्लेखोरांविरोधात लेखी तक्रार दिली. पण तक्रार दाखल होण्यास विलंब होत असल्याने त्यांचा संयम सुटला.

पाच तासांनंतर गुन्हा दाखल

या प्रकरणात पोलिस नोंदीनुसार २५ नोव्हेंबर रोजी पहाटे ४.१० वाजता लेखी तक्रार प्राप्त झाली आणि सकाळी ४.२३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. तर पिडीत जनार्दन पाटील यांचा आरोप आहे की तक्रार दाखल करायला त्यांना सुमारे पाच तास पोलिस ठाण्यात वाट पहावी लागली. पोलिसांच्या कथित दिरंगाईमुळे संतापून त्यांनी पोलिस ठाण्यात गोंधळही घातला. अखेर तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक प्रवीण बाबासाहेब बाकले यांच्याकडे सोपविण्यात आला. जखमी अवस्थेत आलेल्या पिडीत जनार्दन पाटील यांना तातडीने न्याय मिळायला हवा होता. पण त्यासाठी त्यांना तब्बल पाच तास झगडावे लागले. आता या प्रकरणात आरोपींवर काय कारवाई होते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT