Kalyan East Dog Accident Pudhari
ठाणे

Kalyan East Dog Accident: कल्याण पूर्वेत अज्ञात वाहनाची धडक; मादी श्वानाचा मृत्यू, पिल्लांचे हृदयद्रावक दृश्य पाहून नागरिक संतप्त

गावदेवी मंदिर रोडवरील अपघातानंतर चालक फरार; सीसीटीव्ही तपासणीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण पूर्वेतील गोपाळ कृष्ण नगर परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका श्वानाचा जागीच मृत्यू झाला. हृदय पिळवटून टाकणारी बाब म्हणजे आपली आई रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे हे न समजणाऱ्या तिच्या लहान पिल्लांनी मृत आईचेच दूध प्राशन करण्याचा प्रयत्न केला. या दृश्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

या संदर्भात स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील गावदेवी मंदिर रोडवर गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. रस्ता मोकळा असल्याने अज्ञात वाहनचालकाने आपल्या ताब्यातील वाहन अतिवेगाने चालवून रस्त्यावर फिरणाऱ्या श्वानाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, सदर श्वान गाडीखाली चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच वाहनचालक परिस्थितीची पाहणी न करताच घटनास्थळावरून पसार झाला.

सदर श्वान ही मादी होती आणि तिला काही लहान पिल्ले होती. आपली आई आता जिवंत नाही याची पुसटशी कल्पनाही नसलेली ही पिल्ले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला उठवण्याचा प्रयत्न करत होती. भुकेपोटी तिचे दूध प्राशन करत होती. हे दृश्य पाहून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांचे डोळे पाणावले होते. सकाळी उजेड असतानाही हा अपघात झाला की मुद्दामहून श्वानाला चिरडले गेले, याबाबत परिसरात चर्चा सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील श्वानप्रेमी ओमकार चासकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

त्यांनी तातडीने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेशी संपर्क साधून मृत श्वानाचा देह त्यांच्या स्वाधीन केला. त्यानंतर उघड्यावर पडलेल्या पोरक्या झालेल्या पिल्लांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी एका पशुसंवर्धन संस्थेशी संपर्क साधला. या संस्थेमार्फत आता या पिल्लांचे संगोपन केले जाणार आहे. सदर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. बेजबाबदार वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT