टिटवाळा : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाअंतर्गत येणाऱ्या बारावे-मोहीली-नेतीवली तसेच टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रांवर विद्युत व यांत्रिक उपकरणांच्या अत्यावश्यक देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने शुक्रवार, 27 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपासून ते रात्री 6 वाजेपर्यंत तब्बल आठ तास संपूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या शटडाऊनचा थेट फटका कल्याण-डोंबिवली शहरासह ग्रामीण भागातील लाखो नागरिकांना बसणार असून, संपूर्ण परिसरात तीव्र पाणीकपातीची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेच्या अधिकृत माहितीनुसार, मोहीली व नेतीवली, टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रांतील विद्युत यंत्रणा, पंप, यांत्रिक उपकरणे तसेच तांत्रिक प्रणालींची तातडीची दुरुस्ती व देखभाल करण्यात येणार आहे.
ही कामे सुरळीत व सुरक्षित पाणीपुरवठ्यासाठी अत्यावश्यक असल्याने संपूर्ण यंत्रणा बंद ठेवून दुरुस्ती करण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. त्यामुळे या कालावधीत पूर्ण शटडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या पाणीबंदीचा परिणाम टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा होणाऱ्या कल्याण पूर्व व पश्चिम भागावर तसेच डोंबिवली पूर्व व पश्चिम परिसरावर होणार आहे. तसेच कल्याण ग्रामीण विभागातील मांडा-टिटवाळा, आंबिवली, शहाड, अटाळी आदी परिसरांनाही या पाणीपुरवठा बंदीचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेने नागरिकांना आधीच सतर्कतेचा इशारा देत पाणी साठवणूक करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.