कल्याण: कल्याण-डोंबिवली शहरातील पाणीटंचाई दिवसेंदिवस गंभीर होत असताना महापालिकेने तयार केलेला पाणीटंचाई निवारण कृती आराखडा मात्र फुटकळ उपाययोजनांपुरताच मर्यादित असल्याचे चित्र आहे.
कूपनलिका दुरुस्ती, विहिरींची स्वच्छता आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा अशा तात्पुरत्या उपायांवर महापालिकेची भिस्त आहे.
दुसरीकडे, पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक असलेला धरणाचा पर्याय अद्याप कागदोपत्री नियोजनातच आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात कल्याण-डोंबिवलीकरांची पाण्यासाठी वणवण होण्याची शक्यता आहे.
महापालिकेला उल्हास नदीतून ३२० दशलक्ष लिटर पाण्याचा मंजूर कोटा असताना प्रत्यक्षात उल्हास आणि काळू नदीतून मिळून दररोज ३७५ दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. तरीही शहरातील अनेक भागांत आतापासूनच तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. विशेषतः २७ गावे आणि टिटवाळा परिसराला पाणीटंचाईचा मोठा फटका बसत आहे.
महापालिकेच्या कृती आराखड्यात कल्याणमधील ४०० आणि डोंबिवलीतील १४८ कूपनलिकांच्या दुरुस्तीवर भर देण्यात आला आहे. तसेच विहिरींची स्वच्छता आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. मात्र, टंचाई नसतानाही वर्षभर टँकरवर अवलंबून असलेल्या भागांना कायमस्वरूपी दिलासा देण्याची ठोस योजना दिसत नाही.
टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी यंदा महापालिकेने १० कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. क, ब, ह आणि ग प्रभागांत दररोज सुमारे २० टँकर, तर आय आणि ई प्रभागांत ३० ते ३५ टँकर पुरविले जातात.
मात्र, नागरिकांना पाणी मिळत नसताना टँकर पुरविणाऱ्या यंत्रणेला पाणी नेमके कुठून उपलब्ध होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, शहराची पाण्याची गरज २०३१ मध्ये ६७२, २०४१ मध्ये ८६१, तर २०५१ मध्ये ९९९ दशलक्ष लिटरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
वाढती लोकसंख्या, गृहप्रकल्प आणि विकासकामांच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत निर्माण करण्याची गरज आहे. अन्यथा दरवर्षी उन्हाळ्यात टँकरच्या रांगा आणि पाण्यासाठी नागरिकांची धावपळ हेच केडीएमसीचे वास्तव राहण्याची भीती आहे.
धरणाचा पर्याय अजूनही दूर
भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता काळू आणि उल्हास नदीवर स्वतःचे धरण बांधण्याच्या पर्यायासाठी महापालिकेने सल्लागार नियुक्त करण्यास मंजुरी दिली आहे. काळू नदीवरील प्रस्तावित धरणासाठी ४१२ दशलक्ष लिटर पाणी आरक्षणाचे तत्त्वतः नियोजनही करण्यात आले आहे. मात्र, धरण उभारणी ही दीर्घकालीन प्रक्रिया असल्याने त्याचा तातडीने फायदा नागरिकांना मिळणार नाही.
२७ गावांना ५० दशलक्ष लिटरची तूट
२७ गावांसाठी एमआयडीसीकडून १०५ दशलक्ष लिटर पाण्याचा कोटा मंजूर असताना प्रत्यक्षात केवळ ५५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. म्हणजेच दररोज ५० दशलक्ष लिटरची तूट आहे. त्यात कमी दाबाने पाणी मिळत असल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
बारवी धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत करण्यात आले आहे. यापूर्वी हे नियोजन ३१ जुलैपर्यंत असायचे. दरवर्षी मार्चनंतर केली जाणारी सात टक्के पाणीकपात यंदा ऑक्टोबरपासूनच १० टक्क्यांवर पोहोचली आहे.
मंजूर आणि प्रत्यक्ष पाणीपुरवठा
उल्हास नदीचा मंजूर कोटा : ३२० दशलक्ष लिटर
काळू नदीचा मंजूर कोटा : ४ दशलक्ष लिटर
दोन्ही नद्यांतून प्रत्यक्ष उचल : ३७५ दशलक्ष लिटर
जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता
नेतीवली : १५० दशलक्ष लिटर
मोहिली : १०० दशलक्ष लिटर
बारावे : १४४ दशलक्ष लिटर
टिटवाळा : ७.५ दशलक्ष लिटर
गौरीपाडा : ९५ दशलक्ष लिटर (काम प्रगतिपथावर)