Kalyan Dombivli Stray Dogs pudhari photo
ठाणे

Kalyan Dombivli Stray Dogs : कल्याण-डोंबिवलीत भटक्या श्‍वानांची दहशत वाढली

अवघ्या सहा महिन्यांत १८,४४७ डॉग बाईटच्या नोंदी; कल्याणमध्‍ये ९५४ रुग्णांची नोंद

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीत भटक्या श्‍वानांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. २०२५ मध्ये तब्बल ३१ हजार १६५ डॉग बाईटची नोंद झाली होती, तर यंदाच्या अवघ्या सहा महिन्यांतच १८ हजार ४४७ जणांना श्‍वानांनी चावा घेतल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

त्यात जुलै महिन्यात आतापर्यंत कल्याण पश्चिमेतील रुक्मिणीबाई रुग्णालयात ९५४ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे भटक्या श्‍वानांवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी कल्याण-डोंबिवलीकरांकडून होत आहे. कल्याण-डोंबिवलीत भटक्या श्‍वानांची दहशत वाढत असून डॉग बाईटच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

यंदाच्या पहिल्या सहा महिन्यांची आकडेवारी पाहता जानेवारीत १ हजार ४१, फेब्रुवारीत १ हजार ३७८, मार्चमध्ये १ हजार ४८, एप्रिलमध्ये १ हजार ४०, मेमध्ये १ हजार ३१२ आणि जूनमध्ये १ हजार १६९ डॉग बाईटची नोंद झाली आहे. तर जुलै महिना सुरू असतानाच कल्याण पश्चिमेतील रुक्मिणीबाई रुग्णालयात आतापर्यंत ९५४ नागरिकांना श्‍वानांनी चावा घेतल्याची नोंद आहे.

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयाची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. २०२५ मध्ये संपूर्ण वर्षभरात ३१ हजार १६५ डॉग बाईटच्या घटना नोंदवल्या गेल्या होत्या. मात्र यंदाच्या अवघ्या सहा महिन्यांतच हा आकडा १८ हजार ४४७ वर पोहोचल्याने खळबळ उडाली आहे.

सकाळी शाळेत जाणारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसह सर्वसामान्यांना रस्त्यावरून जाताना भटक्या श्‍वानांच्या टोळ्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी श्‍वान एकत्र येऊन एकट्या -दुकट्या पादचाऱ्यांवर हल्ला करत असल्याच्या घटनाही वाढल्या आहेत.

डोंबिवलीसह कल्याण पूर्व, पश्चिम आणि ग्रामीण भागात हा त्रास सर्वाधिक आहे. रात्रीच्या वेळी आणि पहाटे तर रस्त्यावरून चालणेही मुश्किल झाले आहे. केडीएमसी प्रशासनाने वेळोवेळी निर्बीजीकरण आणि लसीकरण मोहिमा हाती घेतल्या असल्या तरी त्या अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे भटक्या श्‍वानांची संख्या नियंत्रणात येण्याऐवजी वाढत चालल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

डॉग बाईटनंतर रेबीजचा धोका लक्षात घेता रुग्णांना तातडीने लस घ्यावी लागते. त्यामुळे रुग्णालयांवर प्रचंड ताण वाढला आहे. एकीकडे आरोग्य यंत्रणेवर भार आणि दुसरीकडे नागरिकांच्या जीवाला धोका अशी दुहेरी समस्या निर्माण झाली आहे. या संदर्भात आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी श्‍वान चावल्यास उपचाराकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन केले आहे.

विशेष पथके नेमणार

आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितले की, भटक्या श्‍वानांचा प्रश्न आम्ही गांभीर्याने घेतला आहे. लसीकरण मोहीम अधिक वेगाने राबविली जाणार आहे. यासाठी आरोग्य विभागाची विशेष पथके गठीत करण्‍याच्या सूचना दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT