Food Safety Pudhari
ठाणे

Food Safety: विषबाधेनंतरही शोरमा जोरात; कल्याण पूर्वेत पावलोपावली ठेले

नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही विक्रेत्यांवर प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे.

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: उघड्यावर बनविला जाणारा शोरमा खाल्ल्यामुळे भिवंडीमध्ये शंभरहून अधिक ग्राहकांना विषबाधा झाल्याची गंभीर घटना ताजी असतानाही कल्याण-डोंबिवलीमध्ये खाण्यायोग्य नसलेल्या या शोरम्याचे पेव जोरात फुटले आहे.

कल्याण पूर्वेत तर उच्चांक गाठला आहे. गर्दीच्या आणि महत्त्वाच्या ठिकाणी नियमांना हरताळ फासून शोरमा तयार केला जात आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही विक्रेत्यांवर प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे.

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, अन्न सुरक्षा नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. चिकन साठविण्याची पद्धत, वापरले जाणारे साहित्य आणि स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव आहे. त्यातच घरगुती वा वाणिज्य पद्धतीचा गॅस सिलिंडर देखील उघड्यावर ठेवला जातो.

भिवंडीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरसकट कारवायांची गरज

महापालिकेच्या आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे विशेष मोहीम राबवून परवान्यांची तपासणी, अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची चाचणी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कल्याण-डोंबिवलीकरांकडून करण्यात येत आहे.

भविष्यात भिवंडीसारखी दुर्दैवी घटना कल्याण-डोंबिवलीमध्ये घडू नये यासाठी प्रशासनाने केवळ दिखाऊ कारवाई न करतासरसकट सर्वत्र प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे मत जागरूक कल्याण-डोंबिवलीकरांनी व्यक्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT