सापाड : योगेश गोडे
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी रिंगरूट प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचत असताना, या प्रकल्पामुळे परिसरातील गावकऱ्यांवर निर्माण होणाऱ्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रिंगरूट मार्गाला अडथळा ठरणाऱ्या स्टेन पाईपलाईनवर ब्रिज बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून काही महिन्यांत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. मात्र, या वेगाने प्रकल्प रेटण्यात ग्रामस्थांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून रिंगरूट मार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर ग्रामस्थांच्या डोक्यावर अपघाताची टांगती तलवार लटकणार असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
रिंगरूट मार्ग व्हतुकीसाठी खुला करण्यात आल्यानंतर परिसरातील सापड गाव, उंबर्डे गाव, गांधारी रौनक सिटी या गावांमधील हजारो नागरिकांचा शहराशी असलेला थेट संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारण रिंगरूट वाहतूक मार्ग सुरू झाल्यावर या सर्व गावातील नागरिकांना शहरात जाण्यासाठी रिंगरूट मार्ग हाय-स्पीड क्रॉसिंग करून जावे लागणार आहे. रिंगरूटवर अवजड वाहने, कंटेनर, ट्रक्स अत्यंत वेगात धावणार असल्याने नागरिकांचा जीव धोक्यात येणार आहे.
गावातील महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी यांना दिवसातून अनेकदा हा रस्ता ओलांडावा लागणार आहे. म्हणूनच ग्रामस्थांच्या डोक्यावर अपघाताची टांगती तलवार कायम लटकणार, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. याउलट, जिथे स्टेम पाईपलाईन अंडरग्राउंड जाणार आहे आणि जिथे वास्तवात ब्रिजची आवश्यकता नव्हती तेथे ब्रिज बांधण्याचे काम मात्र युद्ध पातळीवर सुरू आहे. “जिथे ब्रिज नको, तिथे पैसे लाटण्यासाठी ब्रिज उभारला जात आहे.
वेगवान मार्गावरून रस्ता ओलांडायचा कसा ?
रिंगरूट मार्ग कल्याण शहरातील अनेक गावांचे मुख्य रस्ते छेदत जात आहे. विशेषत: सापड गावचा मुख्य रस्ता जिथे रिंग रूटला छेदतो, त्या ठिकाणीच स्टेम पाईपलाईनवरील ब्रिजचे उतरणे येत आहे. परिणामी, त्या ठिकाणी रिंग रूटवरून येणारी अवजड वाहने प्रचंड वेगात असतील, गावातून मुख्य रस्त्याने शहराकडे जाणारे नागरिक रस्ता पार करतांना अपघातांना आमंत्रण देणारी परिस्थिती निर्माण होणारआहे.
ग्रामस्थांनी मागील अनेक वर्षापासून सापड गाव क्रॉसिंगसह उंबर्डे-गांधारी परिसरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी ब्रीज उभारणीसाठी मागणी केली होती. मात्र ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत प्रशासनाने गावच्या क्रॉसिंग मार्गावरील ब्रिजच्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या जबरदस्तीच्या कामाला ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.
ग्रामस्थांचा शहराकडे जाणाऱ्या एकमेव मार्गाला रिंग रूट छेदून जात असल्यामुळे आता आम्हा ग्रामस्थांसह विद्यार्थी गृहिणी आणि नागरिकांना शहराकडे जाणे धोक्याचे होणार आहे. अनेक वर्षापासून केलेली उड्डाणपुलाची मागणी देखील प्रशासनाने नाकारली असून आमच्या ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसत रिंग रोड मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. येणाऱ्या काळात रिंग रूट मार्गावर होणाऱ्या अपघाताला जबाबदार कोण?राकेश गोडे, ग्रामस्थ सापड गाव