योगेश गोडे
सापाड : कल्याण-डोंबिवली परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका च्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड प्रकल्पावर आता तीव्र सामाजिक आणि भावनिक वाद निर्माण झाला आहे.
उंबर्डे, सापर्डे, वाडेघर, कोळीवली, हिऱ्याचापाडा आणि गांधारी या गावांतील हजारो ग्रामस्थांनी या प्रकल्पामुळे त्यांच्या घरांवर, उपजीविकेवर आणि श्रद्धास्थानांवर संकट ओढवल्याचा आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या प्रकल्पामुळे म्हसोस्वर देवस्थान बाधित होण्याची शक्यता असून उंबर्डे, सापर्डे, वाडेघर, कोळीवली, हिऱ्याचापाडा आणि गांधारी या गावांतील नागरिकांसाठी हे प्रमुख श्रद्धास्थान मानले जाते. नवीन मार्गामुळे या देवस्थानाचे अस्तित्वच धोक्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
दरम्यान, अनेक कुटुंबे बेघर होण्याच्या मार्गावर असून काही ठिकाणी घरे पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ग्रामस्थांनी पुनर्वसनाबाबत स्पष्ट धोरण नसल्याचा आरोप केला आहे. “आम्हाला योग्य पर्यायी जागा, आर्थिक मदत आणि मूलभूत सुविधा यांची हमी दिली जात नाही. फक्त भूसंपादनाच्या नोटिसा देऊन अन्याय केला जात आहे,” अशी स्थानिकांची भावना आहे.
प्रशासनाने मात्र या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करत, “वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि भविष्यातील लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन हा प्रकल्प आवश्यक आहे. बाधित नागरिकांचे पुनर्वसन नियमानुसार केले जाईल,” असे स्पष्ट केले आहे.
हे फक्त मंदिर नाही, तर आमच्या पिढ्यानपिढ्यांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. गावाच्या वेशीवरील हे जागृत देवस्थान असून रिंग रोडसाठी ते तोडण्याचा निर्णय आम्हाला मान्य नाही.- दत्ता लोखंडे, ग्रामस्थ
रिंग रोड मार्गात मुख्य रस्त्यांचे धोकादायक क्रॉसिंग होणार आहे. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामानिमित्त शहरात जाणाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल. आधीच अपघात होत आहेत; रिंग रोड सुरू झाल्यावर धोका वाढेल.- मंगेश गोडे, युवानेते