ठाणे

KDMC Road : केडीएमसीतील खड्डेमय रस्ते ‘ऑल दि बेस्ट....!’

खड्डेमय रस्त्यांचा ऑल दि बेस्ट नाट्य प्रयोगाला फटका ...,प्रयोग उशिरा सुरु झाल्याने कलावंतानी नाट्यरसिकांसमोर व्यक्त केली दिलगिरी

पुढारी वृत्तसेवा

सतीश तांबे

कल्याण :- गेल्या एक दिड महिन्या पासून सुरुवात झालेल्या पावसामुळे पालिका क्षेत्रातील डांबरी रस्त्यांच्या चाळण झाली असून जागोजागी खड्डे पडले आहे. दरवर्षी रस्ते दुरुस्तीवर कोट्यावधी रुपये खर्च केले जातात ते पावसाच्या पाण्यात गटारगंगा होत असतात. पर्यायाने या खड्डेमय रस्त्याचा परिणाम वाहतूक कोंडीवर होऊन जनजीवन विस्कळीत होते. रविवारी कल्याणातील नाट्यगृहात नाट्य प्रयोगासाठी येत असलेल्या ऑल दि बेस्ट नाटकाच्या टीमच्या बसला खूडेमय रस्त्याचे विघ्न आल्याने नाट्यप्रयोगाला अर्धा तास उशीर झाला. नाट्य कलावंतांना नाट्यरसिकांची दिलगिरी व्यक्त करण्याची नामुष्की ओढवल्याने हताश होऊन केडीएमसी तील खड्डेमय रस्त्‍यांना ‘ऑल दि बेस्ट’ म्हणायची वेळ आली.

नेमीच येतो पावसाळा या प्रसिद्ध काव्यपंक्ती प्रमाणे पावसाळ्यात कल्याण डोंबिवली शहरात रस्त्यावर जागोजागी खड्डे पडण्याचे विघ्न पालिका प्रशासनाच्या मानगुटीवर बसलेले असते याची प्रचित गेल्या दीड दशकांहून अधिक काळा पासून नागरिकांना पदोपदी प्रचितीस येत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डांबरी रस्त्यावरील रस्त्याची आख्यायिका साता समुद्रापलिकडे जाऊन पोहचली आहे.

रस्ते म्हणजे चंद्राचा पृष्ठभाग

रस्त्‍यावरील खड्ड्याने हैराण झाल्याने नागरिकांनी तर थेट राष्ट्रपतीकडे धाव घेत केडीएमसीला उपहासात्मक खड्डे रत्न पुरस्काराने सन्मानित केले होते. तर सोशल मिडीयावरही केडीएमसीतील रस्त्यावर चांगलाच मिम्स ने धुमाकूळ घातला होता. खड्डेमय रस्त्यांना चंद्रावरील भूपृष्ठाची उपमा देण्यात आली होती.अशा ना प्रकारे केडीएमसीतील खड्डेमय रस्त्यांची व्यथा मांडून पालिका प्रशासनाने आजतागायत कोणताच बोध न घेत रस्त्यावरील खड्ड्यांचे विघ्न दूर करण्यासाठी प्रयत्न केले नसल्याचे दिसून येत आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात दरवर्षी पावसाळ्यात पडणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी रस्ते देखभाल दुरुस्ती साठी सुमारे वीस ते पंचविस कोटी रुपये खर्चाची तरतूद केली जात आहे. गत दहा वर्षात पावसाळ्यात पडणाऱ्या रस्त्यावर खड्ड्यांमुळे पावसाळयापूर्वी व पावसाळ्यानंतर केली जाणाऱ्या रस्ते देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी दोनशे कोटी रुपये खर्च केले आहेत.

नागरिकांचा जीव मुठीत धरुन प्रवास

कोट्यवधी रुपये खर्च करूनही कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील डांबरी रस्त्यावर खड्डे पडण्याचे विघ्न कमी काही होत नाही. यंदाही पावसामुळे पालिका क्षेत्रातील डांबरी रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. कल्याण पश्चिम कडील अहिल्या बाई चौक,पार नाका, टिळक चौक,दूध नाका,आधारवाडी, उंबर्डे,आंबिवली, बल्यानी,कल्याण पूर्वेतील तीस गावं,चक्की नाका, खडेगोलवली, श्रीराम टॉकीज चौक ,डोंबिवली पूर्व , पश्चिम तसेच २७ गावातील ग्रामीण भागातील डांबरी रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने नागरिकांना जीवमुठीत धरून या रस्त्यावरून येजा करावी लागत आहे.

तर वाहन चालकांना या रस्त्यांवरून आपली वाहने चालवताना दिव्य पार पाडावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी अहिल्याबाई चौकातील खड्डेमय रस्त्यामुळे एका दुचाकी स्वार महिला खड्या पासून बचाव करता दुचाकी वरून खाली पडल्याने दुचाकीवर पाठी मागे बसलेला तिचा मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. काही वर्षापूर्वी कल्याण पूर्वेतील चक्की नाका ते हाजी मलंग रोड ४५ कोटी रुपये खर्च करून डांबरी रस्त्याचे काम केले होते. मात्र अल्पावधीतच या डांबरी रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याच्या दयनीय अवस्था झाली आहे.

रस्त्‍याची डागडूजी कधी?

आता हा सदरचा रस्ता सिमेंट काँक्रिटचा बनविण्याचा प्रस्तावित केला आहे मात्र आजच्या घडीला या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे आहे. सिमेंटचा रस्ता होईल तेव्हा होईल आता या खड्डेमय रस्त्याची डागडुजी पहिली करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पालिका प्रशासन डांबरी रस्त्यावर पडणारे खड्डे बुझविण्यासाठी खड्ड्या मध्ये खडी टाकत रस्त्यावर खडी पसरवित असल्याने रस्त्या वरून चालणाऱ्या वाहने मुळे खड्ड्यातील खडी ने अधिकच रस्त्यावरचा खड्डा मोठा होत असतो. तर पसरलेली खडी रस्त्यावरून चालणाऱ्या वाहनाच्या चाकांमुळे उडून रस्त्यावरून चालण्याच्या नागरिकांना इजा पोहचवत असल्याच्या घटना घडत आहेत.

खड्डेमय रस्त्यामुळे वाहन चालकांना आपली वाहने खड्डे वाचवित हाकावी लागत असल्याने रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होते, आजारी रुग्णांना वेळेत उचारासाठी नेणाऱ्या रुग्णवाहिकांना ही फटका बसत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. त्याचा परिणाम पालिका क्षेत्रातील सर्वच रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक कोंडी मुळे तासन तास वाहने रस्त्यावर अडकत असल्याचा परिणाम जनजीवना वर होत आहे.

नाटकाचा प्रयोग उशिरा

रविवारी २ ऑगस्ट रोजी कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात ऑल द बेस्ट या नाटकाचा प्रयोग सायंकाळी चार वाजता होता. हा प्रयोग वेळेवर सुुर होऊ शकला नाही. नाटक गाजलेले असल्याने प्रेक्षकांनी संयम ठेवला. नाटकातील नाट्य कलाकारांना नाट्यगृहात पोहण्यासाठी अर्ध्या तासापेक्षा जास्त उशिर झाला. या नाटकातील नाट्य कलाकार मयुरेश पेम आणि मनमीत पेम यांनी नाट्य गृहात येताच रंगमंचावर नाट्य प्रयोग सुरु करण्यापूर्वी नाट्य रसिकांची दिलगिरी व्यक्त केली. वाहतूक कोंडीमुळे नाट्य प्रयोग सुरु होण्यास उशिर झाला. अशा अनेक घटनांमुळे वाहतूक कोंडीचा जनजीवनावर किती परिणाम होतो हे दिसून येत आहे. त्यामुळे केडीएमसीतील खड्डेमय रस्त्यांमधून प्रवास करणाऱ्यांना या निमित्ताने म्हणावे लागत आहे ‘ऑल दि बेस्ट....’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT