डोंबिवली : कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शुक्रवारच्या शेवटच्या दिवसापर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत गुरूवार, शुक्रवार अशी दिवस-रात्र अथक मेहनत घेऊन भाजप, शिवसेना शिंंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी महायुतीचे एकूण २० उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यात बाजी मारली. यामध्ये भाजपने १४, शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने सहा उमेदवार बिनविरोध निवडून आणले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपच्या कचोरे भागातील उमेदवार माजी नगरसेविका रेखा चौधरी त्यांच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने बिनविरोध निवडून आल्या. त्या पाठोपाठ भाजपच्या रामनगर प्रभागातील आसावरी नवरे बिनविरोध निवडून आणण्यात भाजपने बाजी मारली. भाजप उमेदवारांविरूध्द बहुतांशी ठिकाणी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे, काही अपक्षांनी उमेदवारी अर्ज भरले होते.
या सर्वांना थंड करण्याची मोठी मोहीम गुरूवारपासून भाजपा आणि शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुरू केली. त्यामुळे निवडणुकीत आपली शक्ती खर्च करण्यापेक्षा समोरून राजकीय मंडळी आपल्याला एवढी भरभरून प्रेमाने माघार घेण्यास सांगतात. त्याला पाघळून आपल्या पक्षाची, आपली प्रभागातील ताकद, आपली स्वत:ची शहरातील प्रतिमा याचा कोणताही विचार न करता अपक्ष, इतर पक्षांतील उमेदवारांनी भाजप, शिवसेनेच्या गळाला लागून धडाधड युतीच्या उमेदवारांंविरोधातील उमेदवाऱ्या मागे घेतल्या. मागील दोन दिवसात आपले उमेदवार बिनविरोध करण्याची मोठी स्पर्धाच भाजपा आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात लागली होती.
या चढाओढीत भाजपने महिला, पुरूष असे एकूण १४ उमेदवार बिनविरोध निवडून आणले. शिवसेना शिंदे गटाने कल्याण, डोंबिवलीतून एकूण सहा उमेदवार बिनविरोध निवडून आणले. केडीएमसीमध्ये आपणच मोठा भाऊ म्हणून शिवसेनेने जागा वाटपात एकूण ६८ जागा पदरात पाडून घेतल्या होत्या. त्यामुळे भाजपपेक्षा आपल्या जागा बिनविरोध निवडीत अधिक असाव्यात असे शिवसेनेचे गणित होते, मात्र ते फार साध्य झाले नाही. भाजपाने या चढाओढीत बाजी मारली. कल्याण पश्चिमेत भाजपा आणि शिवसेनेच्या उमेदवारांंविरूध्द पक्षातील काही इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दोन्हीकडील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांना दंडशक्तीचा वापर करून उमेदवारी अर्ज माघार घेण्यास दबाव टाकला. त्यांनी पदाधिकाऱ्यांना दाद दिली नसल्याचे समजते.
भाजपाचे १४ बिनविरोध उमेदवार
आसावरी नवरे (प्रभाग क्र. २६ (क), रंजना पेणकर (प्रभाग क्र. २६ (ब), रेखा चौधरी (प्रभाग क्र. १८ (अ), मंदा पाटील (प्रभाग क्र. २७ (अ), विशू पेडणेकर (प्रभाग क्र. २६ (अ), साई शेलार (प्रभाग क्र. १९ (क), महेश पाटील (प्रभाग क्र. २७ (ड), दिपेश म्हात्रे (प्रभाग क्र. २३ (अ), हर्षदा भोईर (प्रभाग क्र. २३ (क), जयेश म्हात्रे (प्रभाग क्र. २३ (ड), डाॅ. सुनिता पाटील (प्रभाग क्र. १९ (ब), पूजा म्हात्रे (प्रभाग क्र. १९ (अ), रविना माळी (प्रभाग क्र. ३० (अ), ज्योती पाटील (प्रभाग क्र. २४ (ब) हे भाजपाचे उमेदवार डोंबिवलीतील प्रभागांमधून विजयी झाले आहेत.
शिवसेनेचे सहा बिनविरोध
डोंबिवली पश्चिमेतील पॅनल क्रमांक २४ मधून विश्वनाथ राणे, रमेश म्हात्रे, वृषाली जोशी, पूर्व भागातून पॅनल क्रमांक २८ (अ) मधून हर्षल मोरे, कल्याण पूर्वेत पॅनल क्रमांक ११ (अ) मधून रेश्मा किरण निचळ, डोंबिवली २८ (ब) प्रभागातून ज्योती मराठे बिनविरोध विजयी झाल्या आहेत.