कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिका ही नेहमीच भ्रष्टाचाराच्या कारणावरुन वादग्रस्त आणि चर्चेत राहिली आहे. काल शुक्रवारी असा प्रकार घडला की, महापालिकेत कोणत्या तरी अधिकाऱ्यांचा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला आहे अशी बातमी पसरली.
ही बातमी पसरताच महापालिकेतील अधिकाऱ्यांनी धूम ठोकल्याने महापालिका पूर्णत: खाली झाली होती. मात्र असे काही नव्हते. तो सापळा नसून ती केवळ अफवा होती. अफवेमुळे हे घडले असले तरी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा धसका अधिकारी वर्गाला आहे. हेच यातून उघड झाले.
महापालिकेच्या विविध खात्यातील अधिकारी कर्मचारी हे लाच स्विकारता पकडले गेले आहे. सुनिल जोशी याचे प्रकरण खूप गाजले होते. त्याचबरोबर अतिरिक्तआयुक्त संजय घरत याने जोशी पेक्षा जास्त लाच स्विकारली होती.
ती देखील बेकायदा प्रकरणात. आत्तापर्यंत अधिकारी कर्मचारी मिळून 46 जण लाच लुचपत प्रकरणी अडकले आहेत. मात्र अडकलेल्या लाचखोर अधिकारी कर्मचारी यांना पुन्हा मागच्या दाराने सेवेत घेऊन त्यांच्या भ्रष्टाचारा मार्ग पुन्हा खुला केला जातो. सुरुवातीला त्यांना अशासकीय कामे दिली जातात. त्यानंतर पुन्हा मूळ पदावर बसविले जाते.
महापालिकेत गेली पाच वर्षे प्रशासकीय राजवट होती. त्यामुळे कोणाचेही कोणावर नियंत्रण नव्हते. परिमाणी अधिकारी आणि कर्मचारी मोकाट होते. आत्ता निवडणूक होऊन सदस्य मंडळ अस्तित्वात आले आहे. त्यामुळे नगरसेवकांकडून जाब विचारला जाणार आहे. महासभा आणि स्थायी समिती आहे. त्यांचाही वचक आहे.
त्याचबरोबर लाच लुचपत प्रतिबंधक खात्याचाही धाक अधिकारी कर्मचारी वर्गास आजही आहे. काल शुक्रवारी महापालिकेत लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडून सापळा रचण्यात आल्याची बात महापालिकेत पसरली. तोच अधिकारी कर्मचारी वर्गाने धूम ठोकली. ही अफवा असल्याचे नंतर उघड झाले तेव्हा कुठे त्यांचा जीव भांड्यात पडला.
चोराच्या मनात चांदणे!
दुसरीकडे महापालिकेची स्थायी समिती सभा प्रशासकीय भवनात दुसरा मजल्यावर सुरु होती. त्यामुळे महापालिकेतील बहुतांश अधिकारी या सभेला उपस्थित होते. सभा सुरु असताना सापळा कसा काय रचला जाईल, असा देखील प्रश्न अफवेमुळे भयभीत झालेल्या अधिकारी वर्गाला पडला नसल्याने चोराच्या मनात चांदणे हीच म्हण याठिकाणी चपखलपणे बसते.