डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत अचानकपणे आकडे फिरल्याने भाजपाचे टेन्शन वाढले आहे. या महापालिकेच्या निकालात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने अनपेक्षितपणे मुसंडी मारली आहे. त्यामुळे केडीएमसीचे महापौर पद शिंदे सेनेकडे जाणार, हे शक्य वाटत आहे.
कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपा आणि शिंदे सेनेच्या महायुतीने जोरदार मुसंडी मागली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्वच्या सर्व म्हणजेच 122 जागांचे कल आता स्पष्ट झाले असून, त्यामध्ये भाजपा आणि शिंदे सेनेच्या युतीने तब्बल 105 जागांवर आघाडी घेतली आहे. समोर आलेल्या सविस्तर आकडेवारीनुसार कल्याण-डोंबिवलीमधील 122 जागांपैकी 105 जागांवर भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीने आघाडी घेतली आहे. त्यात भाजपाने 51 तर शिंदेसेनेने 54 जागांवर आघाडी घेतली आहे. तर उद्धव सेनेची कल्याण डोंबिवलीमध्ये मोठी पीछेहाट झाली असून, उद्धव सेनेला येथे केवळ 9 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर मनसेने चांगली कामगिरी करत 5 जागांवर आघाडी घेतली आहे. याशिवाय काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणूक निकालाच्या आधी भाजपाने जोरदार मुसंडी मारली होती. या ठिकाणी भाजपाचा एकहाती विजय होतो की काय, अशी स्थिती होती. विशेष म्हणजे या महापालिकेत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची चांगली ताकद आहे. परंतु निकालाच्या सुरूवातीला शिंदे यांच्या पक्षाचे टेन्शन वाढले होते. परंतु निकालाचा कल रात्री चांगलाच बदलला आणि भाजपाच्या जागा सरकत खाली आल्या. सध्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला एकूण 52 जागा मिळाल्या आहेत. ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने 10 जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसचा 2 तर, मनसेचा 5 जागांवर विजय झाला आहे. शरद पवार यांच्या पक्षाला एका जागेवर बाजी मारता आली आहे.
दुसरीकडे भाजपाने मात्र 122 पैकी 50 जागांवर विजयी पताका फडकावला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करायची असेल तर एका पक्षाला 61 हा जादुई आकडा पार करावा लागतो. परंतु या महापालिकेत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे अगोदर जास्त जागा निवडून येण्याची शक्यता असलेल्या भाजपाच्या जागा कमी झाल्या आहेत. तर शिंदे यांच्या शिवसेनेने मुसंडी मारली आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर महापौर कुणाचा असणार ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात प्रभाग क्र. 29 अ आणि 16 क मधून भाजपाच्या उमेदवारांनी मोठ्या फरकाने विजय मिळवत लक्ष वेधून घेतले आहे. प्रभाग क्रमांक 29 अ मधून उच्चशिक्षित उमेदवार वकील कविता मिलिंद म्हात्रे या सुमारे 2500 मतांनी विजयी झाल्या आहेत. तर प्रभाग क्रमांक 16 क मधून भाजपाच्या प्रणाली विजय जोशी या सुमारे 3,000 मतांनी विजयी झाल्या आहेत.
विशेष म्हणजे या दोन्ही विजयी उमेदवारांचे कौटुंबिक नाते चर्चेचा विषय ठरत आहे. वकील कविता मिलिंद म्हात्रे या दिवंगत आगरी सेना ठाणे जिल्हा प्रमुख विठ्ठल जोशी यांच्या कन्या आहेत. तर प्रभाग 16 क मधून विजयी झालेल्या प्रणाली विजय जोशी या कविता म्हात्रे यांच्या ननंद आहेत. त्यामुळे केडीएमसी निवडणूक निकालात “नणंदभावजय”चा विजय झाल्याचे चित्र दिसून येत असून परिसरात याची चर्चा रंगली आहे.
दोन्ही प्रभागांमध्ये प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात विकास, नागरी सुविधा आणि स्थानिक प्रश्नांवर भर देण्यात आला होता. निकालानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला आहे. विजयी उमेदवारांनी मतदारांचे आभार मानत प्रभागातील नागरी सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे सांगितले आहे. या निकालामुळे संबंधित प्रभागांमध्ये भाजपाची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र असून आगामी महापालिका राजकारणात या विजयाचा प्रभाव दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कल्याण- डोंबिवली
एकूण जागा - 122
भाजपा - 50
शिवसेना (शिंदे गट) - 53
ठाकरे गट - 11
मनसे - 5
काँग्रेस - 2
राष्ट्रवादी (शरद पवार) - 1