KDMC Encroachment Drive File photo
ठाणे

KDMC Encroachment Drive: कल्याण-डोंबिवलीसाठी केडीएमसीचा मोठा ॲक्शन प्लॅन; ३० नोव्हेंबरपर्यंत अतिक्रमणे स्वतःहून काढण्याचे फर्मान

ग्रामीणसह शहरांतील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवणार

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: कल्याण-डोंबिवलीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने मोठा ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. केडीएमसीच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २३१ नुसार जाहीर सूचना जारी केली आहे.

शहर आणि ग्रामीण भागातील १५ मुख्य रस्ते, पदपथ आणि पदपथालगतच्या मोकळ्या ठेवायाच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणावर टपऱ्या, शेड, अनाधिकृत बॅनर्स व इतर प्रकारचे अतिक्रमण आणि अनाधिकृत बांधकाम झाल्याचे निदर्शनास आले आहे.

अतिक्रमणे आणि अनाधिकृत बांधकामे यांच्यामध्ये चालणारे व्यवसाय व त्यामुळे समोरील रस्त्यावर होणारे बिनापरवाना आणि अनाधिकृत पार्किंग यामुळे वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तसेच सदरच्या अनाधिकृत बांधकामांमध्ये चालणारे व्यवसाय जसे की हॉटेल्स, गॅरेजेस यांना अग्निसुरक्षाविषयक व अन्य आवश्यक परवानग्या नसल्याने नागरिकांच्या जीवित व वित्तास धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या सर्व पार्श्वभूमीवर शहरांतील वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ही सर्व अतिक्रमणे आणि अनाधिकृत बांधकामे हटविण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत शहरांतील १५ प्रमुख रस्ते, पदपथ व पदपथालगतची असलेली सर्व प्रकारची अतिक्रमणे आणि अनाधिकृत बांधकामे पूर्णपणे निष्कासित करण्यात येणार आहेत.

पत्री पूल - पिसवली, मानपाडा - सोनारपाडा - काटई नाका, डोंबिवली स्टेशन - मानपाडा रोड, डोंबिवली पूर्व - छत्रपती शिवाजी महाराज चौक, ठाकुर्ली - कचोरे - पत्री पूल, ९० फूट रस्ता, कल्याण स्टेशन पश्चिम - प्रेम ऑटो, शहाड - कल्याण स्टेशन - शिवाजी चौक - सहजानंद चौक ते दुर्गाडी चौक आणि ब्रिज, सहजानंद चौक ते बेतुरपाडा आणि बिर्ला कॉलेज ते खडकपाडा, दुर्गाडी ते गांधारी - बारावे - अटाळी - टिटवाळा, कल्याण पूर्व ते तिसगाव - चक्की नाका, चक्की नाका - नेतीवली नाका, डोंबिवली स्टेशन पश्चिम - मोठागाव - रेतीबंदर, काटेमानिवली - रौनक सिटी, दुर्गाडी चौक - खडकपाडा - प्रेम ऑटो, मोहिंदरसिंग काबुलसिंग रोड, या नमूद केलेल्या प्रमुख रस्त्यांसह कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील इतर सर्व सार्वजनिक रस्ते, पदपथ व पदपथालगतच्या मोकळ्या ठेवायाच्या जागेमध्ये करण्यात आलेली अतिक्रमणे आणि अनाधिकृत बांधकामे संबंधित व्यावसायिकांनी तात्काळ स्वतःहून ३० नोव्हेंबर पूर्वी काढून घ्यावीत.

विहित मुदतीत अतिक्रमणे आणि अनाधिकृत बांधकामे न हटविल्यास महापालिकेकडून कायदेशीर कारवाई करून ती हटविण्यात येतील. त्यावेळी होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी संबंधितांची राहील.

तसेच हे सर्व रस्ते केवळ उदाहरणादाखल नमूद केले असून, या रस्त्यांसह महानगरपालिका हद्दीतील इतर सर्व रस्ते, पदपथ व पदपथालगतच्या मोकळ्या ठेवायाच्या जागेमध्ये करण्यात आलेली अतिक्रमणे आणि अनाधिकृत बांधकामे नियमानुसार खुल्या करण्याकरिताची कारवाई प्रस्तावित असल्याची संबंधितांनी नोंद घेऊन आपले नुकसान टाळावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT