डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांवर सुरू असलेल्या सातत्यपूर्ण आणि अन्यायकारक कारवाईच्या विरोधात कष्टकरी हॉकर्स व भाजी विक्रेता युनियन अखेर आक्रमक झाली आहे. महापालिकेने कारवाईचा बडगा उगारण्यापूर्वी पुनर्वसनाचा विचार करावा, या मागणीसाठी डोंबिवली पूर्वेतील स्व. इंदिरा गांधी चौकात बुधवारी दुपारी या संघटनेने जोरदार निदर्शने केली.
केडीएमसीचे पथविक्रेता सदस्य भालचंद्र ऊर्फ भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने फेरीवाले सहभागी झाले होते. यावेळी महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांची प्रमुख मागणी पथविक्रेता कायदा २०१४ ची तातडीने अंमलबजावणी करण्याची आहे. याबाबत प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना भाऊ पाटील यांनी प्रशासनाच्या उदासीन कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
ते म्हणाले, केंद्र सरकारने पथविक्रेता कायदा लागू करून बारा वर्षे उलटली, तरीही कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात या कायद्याची अंमलबजावणी केवळ कागदावरच राहिली आहे. पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण नाही, नोंदणी नाही, ओळखपत्र नाही आणि व्यवसायासाठी हक्काची जागाही नाही. प्रशासन केवळ कारवाईच्या नावाखाली आमचा रोजगार हिरावून घेत आहे. डोंबिवलीतील जवळपास दोन हजारहून अधिक फेरीवाल्यांचा व्यवसाय या अचानक कारवाईमुळे पूर्णपणे बंद पडला असून, अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या कष्टकरी वर्गाला दुय्यम प्रकारची वागणूक दिली जात असल्याचा आरोपही भाऊ पाटील यांनी केला.
...अन्यथा आंदोलन अधिक तीव्र
फेरीवाले हे शहराच्या अर्थव्यवस्थेचा आणि सामान्य नागरिकांच्या दैनंदिन गरजांचा एक महत्त्वाचा भाग आहेत. त्यामुळे त्यांच्यावर थेट कारवाई करण्याऐवजी कायद्याने सांगितल्याप्रमाणे त्यांचे सर्वेक्षण करून, नोंदणी करून, त्यांना नियोजित आणि अधिकृत जागा उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी भाऊ पाटील यांनी यावेळी केली. जर प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही युनियनच्या वतीने देण्यात आला आहे.