डोंबिवली : होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने एका सराईत गुन्हेगाराच्या नांग्या ठेचून काढल्या आहेत. रोशन हिरानंद झा (33) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव असून त्याच्याकडून 3 लोडेड पिस्तूलांसह घातक शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे.
आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तथा महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने अवैध अग्निशस्त्रे व घातक शस्त्रे बाळगणाऱ्यांसह रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने करडी नजर केंद्रित केली आहे. एक इसम देशी बनावटीच्या पिस्तूलांसह घातक शस्त्रे विक्रीसाठी घेऊन आला असून सदर शस्त्रांचा साठा त्याने स्वतःच्या घरात लपवून ठेवल्याची माहिती गुरुवारी सहाय्यक उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना खासगी गुप्तहेरांकडून मिळाली होती.
सदर इसम देसलेपाड्यातल्या न्यू गार्डियन स्कूलजवळच्या गोकुळधाम टॉवरमधील 202 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये राहत असून या फ्लॅटमध्ये त्याने घातक शस्त्रांचा साठा लपवून ठेवल्याची खबर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना मिळताच त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांना दिली. सदर इसमाकडे असलेल्या अग्निशस्त्रांमुळे धोका होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे वपोनि अजित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने गोकुळधाम टॉवरला चहोबाजूंनी गराडा घातला.
हल्ला होण्याच्या शक्यतेमुळे सावध पवित्रा
फ्लॅटमध्ये लपलेल्या गुन्हेगाराकडून गोळीबार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने हत्यारबंद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सी विंगमधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या 202 क्रमांकाच्या फ्लॅटवर अचानक छापा टाकला. इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या पोलिसांना पाहून बदमाशाची भंबेरी उडाली.
रोशन हिरानंद झा असे स्वतःचे नाव सांगणाऱ्या या आरोपीच्या घराची झडती घेतली असता पथकाच्या हाती देशी बनावटीची 3 पिस्तूले, 3 जिवंत काडतूसे, 2 रिकामी मॅगझिन,1 धारदार लोखंडी खंजीर,2 धारदार स्टिलचे चाकू, 1 लोखंडी धारदार तलवार असा एकूण 2 लाख 12 हजार 500 रुपये किमतीचा अग्निशस्त्रांसह घातक शस्त्रांचा साठा लागला. या आरोपीच्या विरोधात स्थानिक मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांनी सांगितले.
पोलिसांच्या कामगिरीचे वरिष्ठांकडून कौतुक
टिटवाळ्यातील तालुका पोलीस ठाण्यात 1, तर उल्हासनगर आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्यात मिळून 12 अशा एकूण 13 गुन्ह्यांची मालिका असलेल्या रोशन झा याला शस्त्रांच्या साठ्यासह पकडण्यासाठी स्थानिक पोलीस जंग जंग पछाडत होते. मात्र क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने मोठ्या कौशल्याने या गुन्हेगाराला घातक शस्त्रांच्या साठ्यासह जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. एकीकडे ही शस्त्रे त्याने कुठून आणली? कुणाला विक्री करणार होता?
या प्रश्नांची उकल करण्यासाठी क्राईम ब्रँचने तपास चक्रांना वेग दिला आहे. तर दुसरीकडे जिल्ह्याचे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांनी रोशन झा याला धाडस दाखवून जेरबंद केल्याबद्दल कौतुक केले आहे.