Kalyan Dombivli Aapla Dawakhana pudhari photo
ठाणे

Kalyan Dombivli Aapla Dawakhana : कल्याण-डोंबिवलीत ‘आपला दवाखाना’ बंद

मोफत उपचारांसाठी नागरिकांची वणवण

पुढारी वृत्तसेवा

सापाड : योगेश गोडे

कल्याण-डोंबिवलीतील सर्वसामान्य नागरिकांना घराजवळ मोफत प्राथमिक आरोग्यसेवा देणारे ‘आपला दवाखाना’ १ नोव्हेंबरपासून बंद असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ऐन गरजेच्या वेळी आरोग्यसेवेचे दरवाजे बंद झाल्याने गोरगरीब रुग्णांची परवड सुरू झाली आहे. खासगी दवाखान्यांत उपचार घेण्याची वेळ नागरिकांवर आल्याने काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी शिंदे-भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.

किरकोळ आजारांपासून प्राथमिक उपचारांपर्यंतच्या सुविधा नागरिकांना घराजवळ मोफत उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने ‘आपला दवाखाना’ योजना सुरू करण्यात आली होती. रोजंदारी कामगार, घरकाम करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी ही योजना मोठा आधार ठरली होती.

मात्र, १ नोव्हेंबरपासून दवाखाने बंद असल्याने या नागरिकांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आर्थिक झळ बसत असल्याचे कुलकर्णी यांनी म्हटले आहे. निवडणुका जवळ आल्या की सरकारकडून योजनांच्या घोषणा आणि आश्वासनांचा पाऊस पाडला जातो. मात्र, प्रत्यक्षात जनतेच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केले जाते.

आरोग्य हा नागरिकांच्या जीवनाशी निगडित महत्त्वाचा प्रश्न असताना दवाखाने बंद ठेवणे अन्यायकारक असल्याची टीका त्यांनी केली. ‘आपला दवाखाना’ योजना तातडीने पूर्ववत करावी, आवश्यक वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी आणि औषधांचा नियमित पुरवठा सुरू ठेवावा, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली आहे.

‘निवडणुकीपुरती आश्वासने नकोत, जनतेला प्रत्यक्ष आरोग्यसेवा द्या. गोरगरीबांना उपचारांपासून वंचित ठेवून विकासाच्या घोषणा करण्यात काय अर्थ? सरकारने तातडीने दवाखाने सुरू करावेत; अन्यथा काँग्रेस पक्ष जनतेच्या आरोग्याच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरेल,’ असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, दवाखाने बंद राहिल्याने नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून, राज्य सरकार याबाबत कधी निर्णय घेणार आणि आरोग्यसेवा पुन्हा कधी सुरू होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT