Thane District Crime pudhari photo
ठाणे

Thane Crime : कल्याण-डोंबिवलीत ४० दिवसांत अपहरणाचे ६४ एफआयआर दाखल

नऊ अल्पवयीन, ३५ महिलांचा समावेश; स्थानिक पातळीवर चिंता

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कल्याण परिमंडळ ३ क्षेत्रात अपहरणाच्या वाढत्या आकडेवारीने महिला आणि अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.

१ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या अवघ्या ४० दिवसांच्या कालावधीत या झोनमधील आठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये अपहरणाशी संबंधित एकूण ६४ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक असल्याने स्थानिक पातळीवर चिंता अधिक गडद झाली आहे.

आकडेवारीतील स्थिती पाहता दाखल झालेल्या ६४ प्रकरणांमध्ये एकूण ३५ महिला आणि २९ पुरुषांचा समावेश आहे. विशेषतः चिंताजनक बाब म्हणजे अल्पवयीन मुलांची संख्या एकूण ९ असून अल्पवयीन मुलांच्या अपहरणाचे गुन्हे समोर आले असून यामध्ये ५ अल्पवयीन मुली आणि ४ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

पोलीस ठाणेनिहाय आकडेवारीवर नजर टाकल्यास एकूण गुन्ह्यांपैकी ७० टक्क्यांहून अधिक गुन्हे हे केवळ तीन पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले आहेत. मानपाडा पोलीस ठाण्यात १७ प्रकरणे, खडकपाडा पोलीस ठाण्यात १५ प्रकरणे आणि कोलसेवाडी पोलीस ठाण्यात १४ प्रकरणे अशी नोंद आहे.

या तिन्ही क्षेत्रांमध्ये मिळून एकूण ४६ एफआयआर दाखल झाले आहेत. उर्वरित १८ प्रकरणे बाजारपेठ, महात्मा फुले चौक, टिळकनगर, विष्णूनगर आणि रामनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहेत.

पोलिसांनी या प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमांखाली कारवाई सुरू केली असून कलम १३७ (२) अपहरणाशी संबंधित अपराध, कलम १३८ अपहरण म्हणजेच बळाचा वापर किंवा फसवणुकीने एखाद्या व्यक्तीला घेऊन जाणे आणि कलम १४० (३) खंडणीसाठी अपहरण किंवा अपहरणाशी संबंधित कठोर कलम यांचा समावेश आहे, प्रकरणाचे गांभीर्य आणि परिस्थितीनुसार संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये ही कलमे लावण्यात आली आहेत.

धरपकड मोहिमेवर लक्ष

अल्पवयीन आणि महिलांशी संबंधित या संवेदनशील प्रकरणांमध्ये पोलीस प्रशासनाची जलद कारवाई, बेपत्ता व्यक्तींची सुरक्षित सुटका आणि तपासाची गती अत्यंत महत्त्वाची झाली आहे. एफआयआर दाखल होणे ही कोणत्याही घटनेची प्राथमिक कायदेशीर सूचना असून ती प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाचा आधार बनते. आता सर्वांच्या नजरा पोलिसांच्या धरपकड मोहिमेवर आणि बेपत्ता व्यक्तींना सुरक्षितपणे परत आणण्याच्या कारवायांकडे लागल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT