Kalyan Dombivli Cluster Scheme Pudhari
ठाणे

Kalyan Dombivli Cluster Scheme: कल्याण-डोंबिवलीतील 27 गावांत क्लस्टर योजनेला तीव्र विरोध; आंदोलनाचा इशारा

संघर्ष समितीचा एल्गार; ‘भूमिपुत्रांना भूमिहीन करण्याचा डाव’ असा आरोप, गावागावांत जनजागृती सुरू

पुढारी वृत्तसेवा

नेवाळी : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 27 गावांमध्ये क्लस्टर योजना राबविण्यात येणार असून या क्लस्टर योजनेला येथील नागरिकांनी विरोध केला आहे. याबाबत सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने एल्गार पुकारला असून चर्चा तर होणारच या कार्यक्रमाच्या माध्यमातून 27 गावांतील प्रत्येक गावांमध्ये क्लस्टर योजने विरोधात जनजागृती केली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून सोनारपाडा येथील साई बाबा मंदिरात जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या सभेत कशाप्रकारे क्लस्टर योजना 27 गावांवर लादून येथील भूमिपुत्रांना भूमिहीन करण्याचा डाव असल्याचे सांगण्यात आले आहे.

क्लस्टर योजना रद्द न केल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष समिती अध्यक्ष खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिला आहे. यावेळी समितीचे उपाध्यक्ष सत्यवान म्हात्रे, सुमित वझे, रतन पाटील, रामचंद्र पाटील, मधुकर माळी, शिवाजी माळी, संदीप पालकरी, राहुल जाधव, विठ्ठल वायले, तुळशीराम पाटील, हरिश्चंद्र राणे, तकदीर काळन, नगरसेवक महेश पाटील, जालिंदर पाटील, कैलास जोशी, निलेश खांबायत, माजी नगरसेवक गणेश भाने, संदीप माळी, संतोष केणे आदींसह सर्वच राजकीय पक्षांचे, इतर अनेक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

क्लस्टरमुळे पूर्ण गावंच्या गावं उध्वस्त होणार आहेत. याबाबत केडीएमसी आयुक्तांना निवेदने दिली, मोर्चा देखील काढला आहे. त्याअनुषंगाने गावांमध्ये जनजागृती होण्यासाठी सभा लावली होती. जो पर्यंत 27 गावांची स्वतंत्र महानगरपालिका होत नाही तोपर्यंत क्लस्टरचे भूत आपोआप उडून जाईल. यासाठी आमची लढाई शेवटच्या टोकापर्यंत लढणार आणि आमचा विजय होणार असा विश्वास सत्यवान म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत आपल्या मर्जीविरुद्ध 27 गावांना समाविष्ट केले आहे. याविरोधात सर्व पक्षीय हक्क सरंक्षण संघर्ष समिती लढा देत आहे. या समितीच्या नेतृत्वात नुकतेच केडीएमसी मुख्यालयावर आंदोलन करण्यात आले. यामध्ये क्लस्टर आणि कर या विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यावर सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्वांसह बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. क्लस्टर योजनेबाबत माहिती देण्यासाठी 27 गावातील नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांना या सभेसाठी बोलविण्यात आले होते. 27 गावात क्लस्टर योजना नसल्याच्या अफवा पसरविण्यात येत होत्या मात्र क्लस्टर योजनेचे शासन परिपत्रक आणि नकाशे नागरिकांना दिले असून या अफवा पसरवीणाऱ्यांना उत्तर जनताच देणार आहे.

वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू

या सभेबाबत चर्चा तर होणारच अशी जाहिरातबाजी 27 गावांमध्ये करण्यात आली होती. चर्चा तर होणारच हा संघर्ष समितीचा नवा अध्याय असून यामाध्यमातून प्रत्येक गावात जनजागृती करणार असल्याचे सुमित वझे यांनी सांगितले आहे. तर क्लस्टर योजना हि झोपडपट्टी भागासाठी असते मात्र 27 गावांत सरसकट क्लस्टर योजना लादली आहे. यामध्ये जबरदस्ती जागा अधिग्रहण केली जाणार असून या क्लस्टर योजनेला विरोध असून याबाबत महापालिकेत देखील विरोध केला जाणार असून, कायदेशीर लढाई लढू, वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून देखील लढाई लढण्याचा इशारा भाजपा नगरसेवक महेश पाटील यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT