Fraud Case file photo
ठाणे

Cyber Fraud: कल्याणकर आजींशी जोडले दहशतवाद्याचे संबंध; हॅकर्सनी घातला 73.30 लाखांचा गंडा

एमएफसी पोलिसांकडून तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: पहलगाममध्ये ज्या दहशतवाद्याने हल्ला केला तो पाकिस्तानचा होता. त्या दहशतवाद्याकडे तुमचा मोबाईल क्रमांक आहे. त्या दहशतवाद्याने पैशांचे बेनामी व्यवहार केले आहेत. तुमचाही या सर्व प्रकरणात सहभाग असल्याचे आम्हाला कळाले आहे. तुमच्या बँक व्यवहारांची आम्हाला तपासणी करायची असल्याची ठापेबाजी करून पाच हॅकर्सनी मिळून कल्याणमध्ये राहणाऱ्या आजींकडून गेल्या पाच दिवसांच्या कालवधीत एकूण 73 लाख 30 हजार रूपये उकळल्याचे महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीतून उघडकीस आले आहे.

या प्रकरणी आजींनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. यातील तक्रारदार 82 वर्षीय आजी पश्चिमेकडील कल्याण-मुरबाड रोडला सिंडीकेट परिसरात असलेल्या एका गृहसंकुलात राहतात. आजींच्या बाबतीत फसवणुकीचा हा सारा प्रकार 6 ते 10 एप्रिल या कालावधीत घडला आहे. पोलिसांनी आजींच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गृहिणी असलेल्या आजी 6 एप्रिल रोजी घरी होत्या. त्यादिवशी स्वतःचे नाव विजय खन्ना असल्याचे सांगणाऱ्या इसमाने आजींशी मोबाईलद्वारे संपर्क साधला. त्यानंतर त्याच्या इतर चार साथीदारांनी देखिल संपर्क साधून तपास अधिकारी असल्याचे भासवून आजींना घाबरवून सोडले.

या पाच बदमाशींनी आजींना गेल्या पाच दिवसांच्या कालावधीत सातत्याने संपर्क साधला. मोबाईलचा सीमकार्डधारक पाकिस्तानचा फौजी नसून तो दहशतवादी आहे. त्याने पहलगाममध्ये भारतीय पर्यटकांवर हल्ला केला आहे. या दहशतवाद्याने काही संशयास्पद बेनामी गैरव्यवहार केले असून या व्यवहारांमध्ये तुमच्या मोबाईल क्रमांकाचा समावेश आहे. व्यवहारांमध्ये संबंध असल्याचे हे पाचही बदमाश आजींना सांगून घाबरवत होते.

पाच दिवसांत आजींचे बँक खाते रिकामे

दहशतवादी आणि तुमच्यात झालेल्या बेनामी व्यवहारांचा आम्ही तपास करत आहोत. या प्रकरणात तुमचेही बँक व्यवहार आम्हाला तपासायचे असल्याचे सांगून त्या पाचही बदमाशांनी आजींना वेगवेगळ्या बँकांचे तपशील व्हॉट्स ॲपवर पाठवले. त्यांच्या बँक खात्यांवर टप्प्याटप्प्याने बदमाशांनी रकमा पाठविण्यास सांगितल्या.

6 तारखेपासून 10 तारखेपर्यंत पाच दिवसांच्या कालावधीत त्या पाचही बदमाशींनी मिळून आजींच्या बँक खात्यातून आरटीजीएस आणि ऑनलाईनच्या माध्यमातून एकूण 73 लाख 30 हजार रूपये स्वतःच्या खात्यांवर टप्प्याटप्प्याने वळते करून घेतले. हा सारा प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितल्यावर आजींना आपली फसवणूक झाल्याची खात्री पटली. त्यांनी तात्काळ महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली. या प्रकरणी पोलिस निरीक्षक विजय नाईक चौकस तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT