Court Order Pudhari
ठाणे

Kalyan News: कल्याणातील आठ वर्षांपूर्वीच्या खटल्याचा लक्षवेधी निकाल

गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्याला 20 वर्षांचा तुरुंगवास

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: लैंगिक अत्याचार केल्याने एका 15 वर्षीय गतिमंद मुलगी पाच महिन्यांची गर्भवती राहिली. मात्र प्रकरण अंगाशी येत असल्याचे कळाल्यावर या विशेष मुलीवर अत्याचार करणाऱ्या तिच्या मावशीच्या पतीने तिला कल्याणला फिरायला नेतो सांगून जळगाव येथून 400 किलोमीटर अंतरावरील कल्याणच्या रेल्वे स्थानक परिसरात आणून बेवारस स्थिती सोडून दिले.

लैंगिक अत्याचार करून गर्भवती असलेल्या या मुलीला बेवारस स्थितीत सोडून देऊन पळ काढणाऱ्या जळगावच्या तिच्याच 39 वर्षीय नातेवाईकाला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी कठोरात कठोर 20 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.

आठ वर्षांपूर्वी 2019 सालात या गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक हरीष कांबळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीनुसार लैंगिक अत्याचार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता.

पिडीत गतिमंद मुलीचे वडील, भाऊ किंवा अनोळखी व्यक्तींच्या विरूध्द गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला होता. हा खटला कल्याण न्यायालयात गेल्या आठ वर्षांपासून सुरू होता. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून आर. आर. भोईर यांनी काम पाहिले.

मे 2019 रोजी भिवंडीतील कोनगाव परिसरात राहणारे टॅक्सी चालक रंजीत परदेशी यांना कल्याण पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या साधना हॉटेल समोरच्या रस्त्यावर संध्याकाळच्या सुमारास रडत असलेली गतिमंद मुलगी बेवारस स्थितीत आढळली. रंजीत यांनी ही माहिती महात्मा फुले चौक पोलिसांना दिली. पोलिसांनी या मुलीला तिचे नाव, पत्ता विचारल्यावर ती काही सांगत नव्हती.

गतिमंद असल्याचे निदर्शनास आल्यावर पोलिसांनी या विशेष मुलीला उल्हासनगरमधील मुलींच्या बाल निरीक्षण गृहात दाखल केले. वैद्यकीय तपासणी दरम्यान ही मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. या मुलीची सखोल चौकशी केल्यावर तिने आपण जळगाव येथील रहिवासी असल्याचे सांगितले.

मुलीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी जळगाव भागातील पोलिस ठाण्यांच्या माध्यमातून तिची माहिती प्रसारित केली. जळगाव भागात शोध घेतल्यानंतर पोलिस तिच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी मुलीच्या मावशीच्या पतीला ताब्यात घेतले. त्याने या गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची कबूली दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई केली.

पुनर्वसनासाठी साह्य करण्याच्या सूचना

अज्ञानाचा गैरफायदा घेत या विशेष मुलीवर आरोपीने लैंगिक अत्याचार केले. गर्भवती राहिली असल्याचे कळताच आरोपीने तिला जळगावहून 400 किलोमीटर अंतरावर असलेल्या कल्याणला आणून रेल्वे स्थानक परिसरात बेवारस स्थितीत सोडले. खाऊ घेऊन येतो, अशी थाप मारून आरोपी मुलीला सोडून पसार झाला.

या मुलीच्या जिवीताचा कोणताही विचार न करता आरोपीने केलेले कृत्य निंदनीय असल्याचे मत व्यक्त करत न्यायालयाने त्याला 20 वर्षाची तुरूंगावासाची शिक्षा ठोठावली. तसेच 40 हजार रूपयांचा दंड ठोठावला. ही रक्कम पिडीत मुलीला देण्याचे न्यायालयाने निर्देश दिले. तसेच पुनर्वसनासह पुढील जीवन प्रवासाचा विचार करून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पिडीतेला साह्य करावे, अशा सूचना न्यायालयाने संबंधित विभागाला दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT