Illegal Cough Syrup Trade
डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण परिसरात अंमली पदार्थ विक्री करण्याच्या पावित्र्यात असलेल्या त्रिकुटाला पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या खास पथकाने स्थानिक पोलिसांच्या सहाय्याने मोठ्या कौशल्याने जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. अटक आरोपींमध्ये पराज्यातील दोघा तस्करांचा समावेश आहे. तर या पथकाने ऑर्केस्ट्राच्या नावाखाली अर्धनग्नावस्थेत अश्लील व विभित्स हावभावाचे नृत्य करून मद्यपी ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या बारवर धाड टाकून ११३ जणांच्या विरोधात कारवाई केली. कल्याण-डोंबिवलीत अशा प्रकारे अंमली पदार्थ व लेडीज बार विरूध्द कारवाई सुरू राहणार असल्याचे परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले.
रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या फोर्टीज हॉस्पीटलकडून बकरी मंडईकडे जाणाऱ्या रस्त्यावर तौसिफ आसिफ सुर्वे (३४, रा. गोविंदवाडी, कल्याण), लिंगराज अपाराय आलगुड (४०, रा. कलबुर्गी, कर्नाटक) आणि इरफान उर्फ मोहसीन इब्राहीम सय्यद (३४, रा. गुलबर्गा, कर्नाटक) हे तिघे संशयास्पदरित्या कोणाचीतरी वाट पाहत असताना आढळून आले. पथकाने अंगझडती घेतली असता या त्रिकूटाकडे Codeine Phosphate & Triprolidine Hcl. Syrup ANREX COUGH SYRUP या नावाचे लेबल असलेल्या १०० मिलीच्या एकूण १२० सिलबंद बाटल्या सापडल्या.
२७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून या तिघांच्या विरोधात स्थानिक बाजारपेठ पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याचे कलम ८ (क), २२ (क) सह औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम १९४० अंतर्गत १९४५ चे नियम कलम १८ (क), १८ (अ), २७ (अ), २८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मानवी शरीरास अपायकारक आणि गुंगी आणणारे कोडेन फॉस्फेट सिरप या त्रिकुटाने कुठून आणले ? ते कुणाला विक्री करण्यात येणार होते ? याचा चौकस तपास सुरू करण्यात आला आहे.
कल्याण पूर्वेकडे कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या सत्यम बारवर धाड टाकून पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या खास पथकाने मोठी कारवाई केली. नियम आणि कायद्याचा कोणताही धाक नसलेल्या या बारवर केलेल्या कारवाईत मालक, चालक, मॅनेजर, कॅशियर, ५ पुरूष वेटर, ४१ महिला वेटर आणि ६३ ग्राहक अशा एकूण ११३ जणांच्या विरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २९६, २२३, ५४,३ (५) सह महाराष्ट्रातील हॉटेल्स रेस्टॉरंट अँड बार रूममध्ये अश्लील नृत्य करण्यास प्रतिबंध व महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण (त्यात काम करणाऱ्या) कायदा २०१६ चे कलम ३, ४, ८ (१) (२) (४) (डान्सबार बंदी कायदा) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईत सत्यम बारचा मालक, चालक, मॅनेजर, कॅशियर अशा चौघांना अटक करून कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने अधिक चौकशीसाठी त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.