

Environmental Damage Kalyan
डोंबिवली : अधिकृत परवानगी न घेता कल्याण पश्चिमेतील रेतीबंदर खाडीतून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरू आहे. रेतीमाफियांच्या या कृत्यामुळे खाडीपात्राचा ऱ्हास होऊन पर्यावरणाचे नुकसान होत आहे. पूर्वी चोरी-छुपे चालणारा हा गोरखधंदा आता राजरोसपणे सुरू झाल्याने निसर्गप्रेमी तथा पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
न्यायालयाने यापूर्वीच राज्यभरातील रेती उत्खननावर कठोर निर्बंध लावले आहेत. शासनाने रेतीच्या उत्खनन बंदीचे आदेश लागू केले आहेत. तथापि कल्याणात शासनाचे आदेश पायदळी तुडवले जात असल्याचे निदर्शनास येते. पश्चिमेतील रेतीबंदर आणि दुर्गाडी किल्ल्याच्या परिसरात खाडीतून खुलेआम रेती उपसली जात आहे.
रेती माफियांच्या बोटींची खाडीत सतत रेलचेल सुरू असते. या बोटींच्या माध्यमातून रेतीचे रात्रं-दिवस उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विशेष म्हणजे ही रेती खाडीच्या काठावर साठवली जाते. त्यानंतर अवजड ट्रक वजा डम्परद्वारे शहराच्या इतर भागात पोहोचवली जाते. तेथून हीच रेती नंतर बांधकाम व्यावसायिकांना चढ्या भावाने विक्री करण्यात येते. कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या चाळी आणि इमारतींच्या बांधकामांसाठी देखील ही रेती वापरली जाते.
महसूल प्रशासनाकडून केवळ दिखाऊ कारवाई केली जात असल्याने निसर्गप्रेमी तथा पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून सुरू असलेला रेतीचा उपसा थांबविण्यासाठी तात्काळ कारवाईसह कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांसह निसर्गप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे.