डोंबिवली : जिममध्ये व्यायामासाठी येणाऱ्या २९ वर्षीय तरूणीशी ३४ वर्षीय जिमच्या मालकाने मैत्री केली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊन पिडीतेला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर मोबाईल हॅक करून अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची या तरूणीला धमकी दिली.
शिवाय ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार केले. लव्ह, प्यार और धोका या हिंदी चित्रपटातील कथेप्रमाणे पिडीत तरूणीला कथित प्रियकराकडून असा अनुभव आला. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी पिडीत तरूणीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून दगाबाज प्रियकराला दीड महिन्यांनंतर बेड्या ठोकल्या आहेत.विनीत गायकर (३४, रा. गायकर हाऊस, कल्याण-पश्चिम) असे अटक आरोपीच नाव असून न्यायालयात हजर केले असता ५ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती या गुन्हाचा तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल चव्हाण यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार पिडीत २९ वर्षीय तरुणी कल्याण पश्चिम भागात कुटूबांसह राहत आहे. ही तरूणी विनीत गायकर याच्या जिममध्ये व्यायाम करयला जात असे. त्याच सुमारास विनीतशी जिममध्ये ओळख होऊन मैत्री झाली. त्यानंतर पिडीतेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवले. हा दगाबाज एवढ्यावर थांबला नाही तर त्याने पिडीतेचे खासगी व्हिडियो मोबाईलमध्ये तयार केले. याबद्दल तिने जिमचा मालक विनीतला जाब विचारला. व्हिडियोच्या माध्यमातून आरोपी विनीत गायकर हा त्या तरूणीला ब्लॅकमेल करू लागला.
पिडीत तरूणीने १४ ओक्टोबर रोजी खडकपाडा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कथित प्रियकर विनीत गायकर याच्या विरोधात सायबर क्राईम, ब्लॅकमेल, लैंगिक शोषण अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला. एकीकडे आपल्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याची कुणकुण लागताच आरोपी विनीत गायकर फरार झाला. अखेर दीड महिन्यांनी पोलिसांनी कल्याण पश्चिमेतील फडके मैदान परिसरात पोलिसांनी सापळा लावून आरोपी विनीत गायकर याला बेड्या ठोकल्या.
राजकीय दबावाला पोलिसांकडून फाटा
आरोपी विनीत गायकर याने दीड महिन्यांपूर्वी राजकीय बळाचा वापर करत तरुणीवर दबाब टाकण्याचा प्रयत्न केला. राजकारणी आपल्यामागे असल्याने पोलिस आपले काही बिघडवू शकत नसल्याची त्याला खात्री होती. मात्र पोलिसांनी मोठ्या कौशल्याने शोध घेऊन त्याला बेड्या ठोकून गजाआड केले. कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला अधिक चौकशीसाठी ५ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.