ग्रामस्थच झाले लाईनमन (Pudhari Photo)
ठाणे

Thane News | एक गाव जिथे दहा दिवसांपासून नाही विजेचा ठाव

Thane electricity issue | कळभोंडे गाव दहा दिवसांपासून अंधारात; वीज वितरणचे अक्षम्य दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा
राजेश जागरे

Thane electricity issue

शहापूर : तालुक्यातील आदिवासी बहुल भाग असलेल्या कळभोंडे ग्रामपंचायत हद्दीतील वीज वितरणचे विद्युत पोल पडल्याने येथील वीज व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याने लोडशेडिंग व्यतिरिक्त तब्बल दहा दिवस लाइट गायब झाली आहे. महावितरणकडून यावर कुठलीच उपाययोजना होत नसल्याने परिसरातील गावावर अंधारात राहण्याची नामुष्की ओढवली आहे. सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने विजेशी संबंधित व्यवसायिकांवर संक्रांत आली आहे.

कसारा भागातील १ हजार ३५० लोकसंख्या असलेल्या कळभोंडे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नविनवाडी, लादेवाडी या भागात वादळी वाऱ्याने वीज वितरणचे पोल भुईसपाट केले आहेत. ग्रामपंचायतीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कसारा सेक्शनला पत्रव्यवहार करुन १५ दिवस झाले तरी त्याची दखल घेतली नसल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य शिवाजी वीर यांनी दिली. या भागात कायम वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. दिवसेंदिवस वीज प्रश्न वाढत असल्याने यावर कायमस्वरूपी आणि दीर्घकालीन उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे वीर यांनी सांगितले.

गावखेड्यातही माणसं राहतात, याचा विसरच महावितरणवाल्यांना पडतो काय असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.

ग्रामस्थच झाले लाईनमन

मागील तीन आठवड्यापासून शहापूर तालुक्यात अवकाळी पावसाचे वातावरण आहे. याचा फटका सर्वाधिक बसतोय तो ग्रामीण भागाला. पाऊस आणि वादळ यामुळे वीज वितरण कंपनीचे वाभाडे निघाले. कळभोंडे भागात या वादळी वाऱ्यात पडलेले विजेचे पोल ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार करून उभे करण्यात आले नाहीत. त्यामुळे येथील ग्रामस्थ सुरेश अगिवले, हरेश गिरा, भालचंद्र खडके पोलीस पाटील व शिवाजी वीर यांनी पुढाकार घेऊन इतर ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नाने गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत विद्युत पोल उभे करुन वीज प्रवाह सुरळीत करण्यात आला. मेंटेनन्सच्या नावाखाली लाखो रुपयांचा चुराडा होऊनही दरवर्षी विजेचा लपंडाव सुरूच असतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT