सोलापूर ः प्रतिनिधी
ग्रामीण भागातील सुमारे तीनशे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने वीज बिल भरणा न केल्याने महावितरण कंपनीकडून या शाळांची वीज तोडण्यात आली आहे. वीज बिल ग्रामपंचायतीने भरायचे की शाळेच्या मुख्याध्यापकांनी यावरून अनेक ठिकाणी वाद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य मात्र अंधारात सापडले आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे लाईट बिल स्थानिक ग्रामपंचायतींना भरण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश दिले असताना ग्रामपंचायतींनी बिलेच भरली नाहीत. त्यामुळे या शाळांचा वीजपुरवठा तोडण्यात आल्याने शैक्षणिक कामावर विपरीत परिणाम होत आहे.
सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिवानंद भरले यांनी ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. यापूर्वी मुख्याध्यापक शाळेतील शिक्षकांकडूनच वर्गणी करून शाळेचे लाईट बिल अदा करत होते. दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाकडून शाळेचे लाईट बिल ग्रामपंचायत निधीतून भरण्यासाठी पत्र काढण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापकांनी बिल भरणे बंद केले.
सुरुवातीला दोन-तीन महिन्यांचे बिल ग्रामपंचायतीकडून भरण्यात आले. त्यानंतर मात्र ग्रामपंचायतीकडून बिलच भरले नाही. आता किमान 5 ते 6 हजार रुपये थकबाकी एका शाळेची राहिली आहे. हे बिल मुख्याध्यापकांनाही भरणे आता अशक्य झाले आहे. शाळेची लाईट तोडल्याने ऑनलाईन माहिती भरणे बंद झाले आहे. डिजिटल शैक्षणिक उपक्रम राबविणे बंद झाले आहे. ऑक्टोबर हिट असल्याने उकाड्यात विद्यार्थ्यांना वर्गात बसावे लागत आहे.
शाळेचे लाईट बिल ग्रामपंचायत निधीतून भरण्यासाठी आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पुन्हा ग्रामपंचायतीला द्यावा, खंडित झालेला विद्युत पुरवठा पूर्ववत चालू करावा, अशी मागणी शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी संभाजी फुले, लिंबराज जाधव, उत्तम जमदाडे, विठ्ठल काळे, बाळासाहेब गोरे, दादाराजे देशमुख, संजय ढगे, ज्ञानेश्वर चटे, रेवणसिद्ध हत्तुरे, सिद्राम कटगेरी, वीरभद्र यादवाड, सूर्यकांत हत्तुरे आदी उपस्थित होते.