बनकरफाटा येथील मजुरीच्या प्रश्नावरून सावर्णे येथे एकत्र आलेले मुरबाड व शहापूर तालुक्यांतील आदिवासी मजूर. pudhari photo
ठाणे

Thane Tribal Labourers Protest : मजुरांना मारहाण अन् मनमानी मजुरीचे दर; जुन्नरमध्ये काम करणाऱ्या हजारो आदिवासी मजुरांचा एल्गार

बनकरफाट्याच्या प्रकाराविरोधात माळशेज घाटात आंदोलन; कामावर जाण्यास नकार देत माघार

पुढारी वृत्तसेवा

मुरबाड : किशोर गायकवाड

जुन्नरच्या शेतशिवारात घाम गाळणाऱ्या मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील आदिवासी मजुरांच्या संतापाचा गुरुवारी उद्रेक झाला. बनकरफाटा येथे मजुरांना मारहाण, अपमानास्पद वागणूक आणि मनमानी मजुरीचे दर लादले जात असल्याच्या आरोपांवरून हजारो मजूर रस्त्यावर उतरले. गुरुवारी (२० नोव्हेंबर) पहाटे माळशेज घाटाच्या पायथ्याशी सावर्णे येथे मजुरांनी जोरदार एकजूट दाखवली. घाटाकडे जाणारी मजुरांची वाहने अडविण्यात आली. परिणामी अडीच ते तीन हजार मजुरांनी कामावर जाण्यास नकार देत माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनामुळे शेतमजुरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील आदिवासी कुटुंबांचा उदरनिर्वाह जुन्नर परिसरातील शेतीमजुरीवर अवलंबून आहे. पहाटे तीन-चार वाजता घर सोडून शेतावर जायचे आणि दिवसभर राबून रात्री उशिरा परतायचे, अशी त्यांची दिनचर्या आहे. मात्र, कष्टाच्या मोबदल्यात अपमान, मारहाण, टोमणे आणि अतिरिक्त काम करून घेतले जात असल्याच्या तक्रारी वारंवार पुढे येत आहेत. बनकरफाटा येथील कथित मारहाणीच्या प्रकाराने या असंतोषाला तोंड फुटले.

मजूर प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार, शेतकरी वर्गातील अकरा जणांच्या समितीने महिला मजुरांसाठी ७०० रुपये, पुरुषांसाठी ८०० रुपये आणि खुरपणीसाठी ५०० रुपये मजुरी निश्चित केली आहे. मजुरांना विश्वासात न घेता दर ठरविण्यात आल्याचा त्यांचा आक्षेप आहे. यापूर्वी काही कामांसाठी एक हजार ते बाराशे रुपये मजुरी मिळत असल्याचा दावाही मजुरांनी केला आहे.

आंदोलनादरम्यान मजूर वाहून नेणाऱ्या वाहनचालकांना घाटमाथ्यावर वाहने नेऊ नयेत, अन्यथा पाच हजार रुपये दंड आकारण्याचा इशारा देण्यात आला. तसेच आंदोलनाला विरोध करून कामावर जाणाऱ्या मजुरांना बाराशे रुपये दंड लावण्याची घोषणाही करण्यात आली. दरम्यान, या दंडात्मक घोषणांना कायदेशीर अधिकाराची मर्यादा लागू राहणार आहे.

विकासाच्या दाव्यांनंतरही रोजगारासाठी स्थलांतर!

मुरबाडमध्ये औद्योगिक विकासाचे दावे होत असताना हजारो आदिवासी मजुरांना रोजगारासाठी पुणे जिल्ह्यातील जुन्नर गाठावे लागत आहे. मजुरीचे दर, कामाचे तास, सुरक्षित प्रवास आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक या प्रश्नांवर ठोस तोडगा काढण्याची मागणी होत आहे. ठाणे व पुणे जिल्हा प्रशासन, कामगार विभाग आणि पोलिसांनी संयुक्त बैठक घेऊन मजुरांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा, अशी मागणी आंदोलनातून पुढे आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT