डोंबिवली : क्रीडा स्पर्धा, मैदानी खेळ आणि शिक्षणात रस घेण्याऐवजी आजकालच्या विद्यार्थ्यांची पावले चार भिंतीच्या आत कॉम्प्युटरवर चालणाऱ्या गेम संस्कृतीकडे वळत चालली असताना कल्याणमध्ये सुरू असलेल्या जॉयस्टीक गेम झोनच्या तिघांवर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.
देशाची भावी पिढी वाममार्गाला जाऊन उद्ध्वस्त होऊ नये, याची काळजी घेणाऱ्या कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कल्याणमध्ये पाऊल ठेवल्यापासून अमली पदार्थांची तस्करी खरेदी-विक्री करणाऱ्यांवरील कारवाई पाहता आता तर डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणकर पालकांसाठी डोकेदुखी ठरलेले जॉयस्टीक जंगल उध्वस्त करून बच्चे कंपनीला वाममार्गाकडे आकर्षित करणाऱ्या जॉयस्टीक जंगल गेम झोनच्या तिघांना कारवाईचा हिसका दाखवला आहे.
कारवाई करण्यात आलेल्या या गेम झोनचे मालक पृथ्वीराज राजा चवान (२७), चालक श्रीराम राजा चवान (२५) आणि त्यांचा साथीदार अमित उदाराम सोनवणे (२०) अशी आरोपींची नावे आहेत. या त्रिकुटाच्या विरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे.
कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चिंचोड्यातील जिरेटोप चौकाकडे जाणाऱ्या रोडला असलेल्या रितेश इम्पायर इमारतीच्या गाळा नं. ११ आणि १२ मध्ये जॉयस्टीक जंगल या नावाने गेमझोन सुरू असल्याची खबर दुपारी खासगी गुप्तहेरांकडून पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्यापर्यंत पोहोचली होती.
या गेमझोनमध्ये कोणत्याही प्रकारच्या सुरक्षिततेच्या उपायोजना अगर नियमांचे पालन न करता सदर ठिकाणी अल्पवयीन मुलांना प्रवेश दिला जात होता. पोलीस उपायुक्त झेंडे यांनी सदर गेमझोनमध्ये जाऊन खात्री केल्यानंतर कारवाईचे फर्मान सोडले होते. त्यानुसार कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश व्हायदे, सपोनि दर्शन पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेमझोनमध्ये जाऊन खात्री केली.
सदर ठिकाणी जॉयस्टीक जंगल नावाचा गेम १८ वर्षांखालील अल्पवयीन मुले-मुली तेथील ८ कॉम्प्युटरवर खेळताना आढळून आले. सदर गेमझोनमध्ये तळमजल्यावर एक बंद खासगी खोली आहे. या खोलीमध्ये कोणत्याही प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रकाश व्यवस्था, व्हेन्टीलेशनची व्यवस्था, फायर सुरक्षा उपकरण, सीसीटीव्ही कॅमेरे, इत्यादी उपायोजना केल्याचे आढळून आले नाही. पोलिसांनी गेम खेळणाऱ्या मुलांना तेथून ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.
पाल्यांबद्दल पालकांना सतर्कतेच्या सूचना
शाळेतून घरी आल्यानंतर अनेक मुलांची पावले ही सर्रासपणे अशा ऑनलाईन गेम झोनकडे वळत असल्याने दुपारच्या सुमारास आपली मुले बाहेर जाऊन नक्की काय करतात? त्यांची पावले वाममार्गाकडे तरभरकटली नाहीत ना? या विवंचनेमुळे पालक मंडळी चिंतातूर झाली होती. एकीकडे डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे पालकांनी सर्वांचे आभार मानले आहेत. तर दुसरीकडे अशा मुलांना गेमझोममध्ये पाठविण्याऐवजी शालेय अभ्यासासह कला, क्रीडा, मैदानी खेळ आणि स्पर्धांवर भर देण्याच्या पोलिसांनी सूचना दिल्या.
त्याचबरोबर अशा प्रकारे अटी व शर्तीचे उल्लंघन करणाऱ्या गेमिंग झोनवर कारवाया अशाच पद्धतीने सुरू राहणार असल्याचेही स्पष्ट करताना पालकांनी सुद्धा याबाबत सर्तक राहून आपल्या मुलांवर विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे आवाहन पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना केले.