ठाणे: जंतर मंतरवरील आंदोलनाने काय झाले, असा प्रश्न जर कुणी विचारला तर या आंदोलनाच्या माध्यमातून तरूण पिढीने एका पक्षाची आणि एका माणसाची दहशत संपविली; या जेन झी ने आपणा सर्वांनाच हास्यविनोद पेरून आंदोलन यशस्वी करण्याचे नवतत्वज्ञान शिकवले, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी गौरवोद्गार काढले.
राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी ठाण्याच्या जयभगवान हाॅल येथे शुक्रवारी सायंकाळी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास डाॅ.जितेंद्र आव्हाड हे संबोधित करीत होते.
डाॅ. आव्हाड म्हणाले की, आपल्याला २०१४ पासून जी भीती होती, आईसची म्हणजेच इन्कम टॅक्स, सी.बी.आय. आणि इ.डी. या तीन संस्थांची! मात्र, आपल्याकडे हरण्यासारखे काहीच नाही, याची जाणीव असलेल्या जेन झी पिढीने आपण घाबरायचे कशाला? असा प्रश्न स्वतःलाच विचारून लढण्यास सुरूवात केली.
हिंसेला अहिंसेने उत्तर देण्याचे तत्वज्ञान अनेक तत्ववेत्त्यांनी सांगितले. मात्र, या तरूणांनी नवीनच तत्वज्ञान आपणाला शिकवले. मुलगा रात्री मार खायचा पोलिसांचा आणि त्याचा चेहरा लक्षात ठेवायचा.
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन पोलिसांच्या बाजूला जाऊन उभा राहायचा अन् विचारायचा, अंकल, आज भी मारोगे? ह्या पिढीने सांगितले की, दहशत संपवायची असेल, तर ती हास्य-विनोदाने संपवून टाका. या पोरांनी हास्य-विनोद असे केले की एका पक्षाची आणि एका माणसाची दहशतच संपवून टाकली. २०१४ साली आपल्याला व्हॉट्सॲप माहित नव्हते, फक्त बीजेपीला माहित होता. त्याने अख्खं राजकारण व्हॉट्सॲपवर फिरवलं.
२०२६ ला अख्खं राजकारण व्हॉट्सॲप विरुद्ध इन्स्टावर आलं आणि इन्स्टामध्ये अशी पोरं घुसली आहेत, की त्यांनी व्हॉट्सॲपवाल्यांची दादगिरी संपुष्टात आली. ज्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जय भीम घोषणा दिली जाते; त्या बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, त्यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखलं होते आणि त्याच शिक्षणाचा आपल्या इथे बट्ट्याबोळ झाल्यामुळे तरूण पिढी लढण्यास सज्ज झाली. या पुढे "जय भीम" हाच शब्द नमस्कार आणि हॅलो ऐवजी वापरला जाणार आहे. यावेळी आव्हाड यांनी मनोज प्रधान यांचे प्रचंड कौतूक केले.
या वेळी शहर अध्यक्ष मनोज प्रधान, विरोधी पक्षनेते शानू पठाण, गटनेते अभिजीत पवार, महिला अध्यक्ष मनीषाताई भगत यांनी मार्गदर्शन केले. प्रकाश बर्डे, युवक प्रदेश सरचिटणीस नताशाताई आव्हाड, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष बुद्धभूषण गोटे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राजा राजापूरकर, ठाणे शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, शमीम खान, यासिन कुरेशी, दिपाली भगत, मर्जिया पठाण, पल्लवी जगताप, अक्षय ठाकूर आदींची भाषणे झाली.