Maharashtra Politics Pudhari
ठाणे

Maharashtra Politics: जनतेला पुन्हा बैल, गाढव, घोड्यावर प्रवास करावा लागेल; जितेंद्र आव्हाडांचा मोदी सरकारवर निशाणा

“जय मोदी म्हणत आता म्हशी, घोडा आणि गाढवांच्या व्यापाराला चालना मिळेल. लोकांना त्यांच्यावर बसून प्रवास करण्याची वेळ येईल,” असा टोला त्यांनी लगावला.

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: पेट्रोल आणि डिझेलच्या किमती येत्या काही दिवसांत 30 ते 40 रुपयांनी वाढू शकतात, असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. “जय मोदी म्हणत आता म्हशी, घोडा आणि गाढवांच्या व्यापाराला चालना मिळेल. लोकांना त्यांच्यावर बसून प्रवास करण्याची वेळ येईल,” असा टोला त्यांनी लगावला.

ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे गटनेते अभिजीत पवार यांच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, विरोधी पक्षनेते अश्रफ उर्फ शानू पठाण, शहराध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पश्चिम आशियामधील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता पेट्रोलियम पदार्थांचा जपून वापर करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केले होते. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीका सुरू झाली आहे. देशात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा असल्याचे सांगितले जात होते, मग अचानक अशी परिस्थिती का निर्माण झाली, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला.

देशाची अर्थव्यवस्था ढासळत चालली असून सामान्य नागरिकांवर मोठे आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले. इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढतील आणि त्याचा थेट फटका सर्वसामान्य जनतेला बसेल, असा इशाराही त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT