Sanjay Yadav Arrest Pudhari
ठाणे

Sanjay Yadav Arrest: झारखंडचा फरार नक्षली संजय यादव ठाकुर्लीत जेरबंद; गवळ्याच्या वेषात ठाकुर्लीत वावर

महाराष्‍ट्र एटीएसची ऐन दिवाळीत लक्षवेधी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: झारखंडमधील फरार नक्षलवादी संजय सरोज यादव ऊर्फ संजय गोदराई ऊर्फ बुधराम (४५) याला डोंबिवलीजवळच्या ठाकुर्ली परिसरातून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने अर्थात एटीएसने मोठ्या कौशल्याने जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.

झारखंड सरकारने या कुख्यात नक्षलवाद्यावर तब्बल १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, एवढा मोठा बक्षीसपात्र नक्षलवादी थेट आपल्या ठाकुर्लीत लपून बसला होता, ही बातमी समजताच ठाणे जिल्‍ह्यात खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एटीएसला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. संशयित नक्षलवादी गेल्या सुमारे दहा दिवसांपासून ठाकुर्ली परिसरात नाव आणि ओळख लपवून राहात होता.

झारखंडमधील पलामू जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या या नक्षलवाद्याला एटीएसने ताब्यात घेतले आहे. तो सामान्य माणसासारखा वावरत होता.

पण त्याच्या हालचालींवर एटीएसची करडी नजर होती. योग्य वेळ साधून एटीएसच्या पथकाने त्याला कोणतीही संधी न देता बेड्या ठोकल्या. त्यामुळे दिवाळीत काही मोठा घातपात घडवण्याचा डाव तर नव्हता ना, असा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे.

गवळ्याच्‍या वेषात वावर

विशेष म्हणजे गाईंची देखभाल आणि दूध काढण्याचे काम करत त्याने आपली ओळख लपवली होती. गेल्या दहा दिवसांपासून तो ठाकुर्ली परिसरात एका सामान्य गवळ्याच्या वेषात राहात होता.

सकाळी गाईंची धार काढायची, गोठ्याची साफसफाई करायची, परिसरातल्या लोकांशी अगदी साध्यासुध्या माणसासारखा वागायचा. त्यामुळे तो एवढा मोठा नक्षलवादी आहे, याचा कुणालाच संशय आला नाही; पण झारखंड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणे एटीएसने ही कारवाई केली आहे.

झारखंड पोलिसांनी दिलेल्या पक्क्या माहितीवरून एटीएसचे पथक ठाकुर्लीत पोहोचले आणि त्यांनी त्याच्या हालचालींवर करडी नजर ठेवली. योग्य वेळ साधून एटीएसच्या पथकाने त्याला कोणतीही संधी न देता बेड्या ठोकल्या.

दिवाळीत घातपाताचा मनसुबा उधळला

ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात १० लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी गवळ्याच्या वेषात आढळल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. तो ठाकुर्लीत कुणाच्या संपर्कात होता? महाराष्ट्रात येण्यामागे त्याचा नेमका उद्देश काय होता? त्याचे अन्य नक्षली संघटनांशी किंवा स्थानिक गुन्हेगारांशी संबंध आहेत का? तो इथे लपण्यासाठी आला होता की काही मोठे कृत्य करण्याच्या तयारीत होता? गाईंच्या गोठ्यात काम करत असताना त्याने कुणाकुणाशी संपर्क साधला होता? या दिशेने एटीएसकडून कसून तपास सुरू आहे.

संजयच्या मोबाईल, कागदपत्रे आणि संपर्कातील व्यक्तींची सखोल चौकशी केली जात आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एटीएसच्या या कारवाईमुळे एक मोठा अनर्थ टळला असल्याची चर्चा आता डोंबिवली, ठाकुर्ली आणि कल्याण परिसरात रंगली आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT