राजू काळे
भाईंदर: नवी दिल्ली येथील जंतरमंतरवर सीजेपी (कॉक्रोचे जनता पार्टी) ने छेडलेल्या आंदोलनाचा गैरफायदा तेथील रिक्षा, टॅक्सी चालक व हॉटेल व्यावसायिकांनी घेतला आहे. रिक्षा व टॅक्सीचे भाडे अनधिकृतपणे वाढविण्यात आल्याने तसेच हॉटेलचे एका दिवसाचे दर वाढविण्यात आल्याने आंदोलक महिला, तरुणी व विद्यार्थिनींच्या निवाऱ्याची परवड होऊ लागली आहे.
नीट पेपरफुटी विरोधात लडाख येथील वैज्ञानिक सोनम वांगचूक यांनी जंतरमंतरवर छेडलेल्या आंदोलनात सीजेपी सामील झाल्याने आंदोलनाला चांगलीच धार मिळाली आहे. वांगचूक यांनी शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केल्यानंतर सीजेपीने मात्र आपले आंदोलन सुरुच ठेवले आहे.
या आंदोलनात देशातील कानाकोपऱ्यातून विद्यार्थी, त्यांचे पालक, विविध संस्थांचे व धर्माची लोकं सामील होत असून आंदोलकांची संख्या सतत वाढत आहे. हे आंदोलन मागे घेण्यासाठी मोदी सरकारकडून प्रयत्न सुरु असून त्याला सीजेपीने अद्याप प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून आले आहे.
मात्र बहुतांशी आंदोलकांमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश असताना त्यात मुलींची संख्या प्रभावी आहे.या विद्यार्थिनींसह काही महिला व तरुणींना रात्रीच्यावेळी निवारा उपलब्ध करून देण्यासाठी सीजेपीचे सदस्य सक्रिय झाले आहेत. दरम्यान या आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणाऱ्यांना टॅक्सी व रिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे.
अशावेळी रिक्षा व टॅक्सी चालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे उकळले जात असून हे अनधिकृत भाडे उकळण्यावर आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एकीकडे आंदोलकांच्या जेवणासह नाश्ता, पिण्याचे पाणी आदी खाद्यपदार्थ विविध राज्यांमधील काही दानशूरांकडून विविध डिलिव्हरी ऍपद्वारे आंदोलनाच्या ठिकाणी विनामूल्य पोहोचविले जात आहे.
तसेच जंतरमंतर परिसरात खाद्यपदार्थ विक्री करणारे गरीब व्यावसायिक देखील आंदोलकांना मोफत खाद्यपदार्थ उपलब्ध करून देत आहेत. तर दुसरीकडे या आंदोलनाचा गैरफायदा टॅक्सी व रिक्षा चालकांकडून घेण्यात येत असल्याचे दिसून आले आहे.
हे रिक्षा व टॅक्सी चालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारून आंदोलकांची ने-आण करीत आहेत. एका बाजूला वाढते दर दुसऱ्या बाजूला वाढलेली महागाई आणि सर्वसामान्य माणसांचे कोलमडलेले गणित त्यात भाडेवाढ यामुळे परवड वाढली आहे.
सहा हजारपर्यंत भाडेवाढ
हॉटेल व्यावसायिकांनी देखील आंदोलनाचा गैरफायदा घेत एका दिवसाच्या रूमच्या भाड्यात मोठी वाढ केली आहे. केवळ एका रात्रीसाठी पूर्वी आकारण्यात येणाऱ्या सुमारे ५०० ते १००० रुपये भाड्यात तब्बल ७०० ते ६००० रुपये भाडेवाढ केली आहे.
आंदोलनात सहभागी झालेल्या महिला, तरुणी व विद्यार्थिनींना रात्रीच्यावेळी सुरक्षितपणे निवारा करता यावा म्हणून मिळत असलेल्या आर्थिक मदतीतून हॉटेलमध्ये तात्पुरत्या स्वरूपात निवाऱ्याची व्यवस्था सीजेपी सदस्यांकडून केली जात आहे. यातही एका रात्रीचे भाडे अवाजवी असल्याने दुसऱ्या रात्रीच्या निवाऱ्यासाठी आर्थिक चणचण निर्माण होत असल्याचे सीजेपी सदस्यांकडून सांगण्यात आले.