गॅस टंचाईमुळे डोंबिवलीतील हॉटेल व्यवसाय अडचणीत pudhari photo
ठाणे

LPG shortage impact restaurants : गॅस टंचाईमुळे डोंबिवलीतील हॉटेल व्यवसाय अडचणीत

एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हॉटेल ओनर्स असोसिएशनने घेतली रवींद्र चव्हाण यांची भेट

पुढारी वृत्तसेवा

नेवाळी : सध्या इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय परिस्थिती तणावपूर्ण बनली असून त्याचे पडसाद भारतातही उमटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने व्यावसायिक वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलिंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, पोळीभाजी केंद्र तसेच फूड इंडस्ट्रीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

डोंबिवली परिसरात गॅसचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने काही हॉटेल आणि पोळीभाजी केंद्रांवर त्याचा थेट परिणाम जाणवू लागला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवली हॉटेल ओनर्स असोसिएशनने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आहे.

याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष अजित शेट्टी यांनी सांगितले की, कल्याण-डोंबिवली आणि दिवा परिसरातील मोठ्या प्रमाणावर नागरिक मुंबईसह विविध ठिकाणी नोकरीसाठी जात असतात. त्यामुळे अनेक जण सकाळचा नाश्ता किंवा जेवणासाठी हॉटेल, उपहारगृह व पोळीभाजी केंद्रांवर अवलंबून असतात. अशा परिस्थितीत व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद झाल्यास या व्यवसायांवर मोठा परिणाम होईल.

व्यावसायिक सिलिंडरचा सरसकट पुरवठा बंद न करता त्यावर पर्यायी तोडगा काढावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. त्यामुळे व्यवसायिकांना दिलासा मिळेल तसेच या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या कर्मचाऱ्यांचा रोजगार टिकून राहील. अन्यथा अनेक कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ येऊन त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीचे संकट ओढवण्याची शक्यता असल्याचे शेट्टी यांनी यावेळी सांगितले आहे. दरम्यान, या मागणीवर प्रशासन व संबंधित यंत्रणा कोणता तोडगा काढतात, याकडे हॉटेल व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT