ठाणे; पुढारी वृत्तसेवा : मुंबई महानगरासह नवी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात घुसखोर बांगलादेशी नागरिकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यात सुमारे 18 हजाराच्यावर बेकायदेशीररित्या बांगलादेशी राहत असल्याची अंदाजित माहितीची नोंद पोलीस दप्तरी करण्यात आली आहे. बांगलादेशींचे प्रमाण ठाणे शहरासह मुंब्रा, दिवा, कल्याण, आंबिवली, भिवंडी, मीरा रोड, भाईंदर, वसई, विरार, नालासोपारा, बोईसर आदी परिसरात दिवसेंदिवस वाढू लागले आहे. या वाढत्या बांगलादेशी नागरिकांची संख्या रोखण्यासाठी ठाणे पोलीस अनेक उपाययोजना करीत आहेत. मात्र, तरी देखील बेकायदेशीर बांग्लादेशींची घुसखोरी सुरूच असल्याचे आढळून येत आहे. पोलीस प्रशासनाच्या आकडेवारीनुसार ठाणे ग्रामीण व ठाणे शहर आयुक्तालय हद्दीत 2022 या वर्षभरात 342 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशींमध्ये मजुरी करणाऱ्यांसोबतच बारबाला व शरीरविक्रेय करणाऱ्या महिलांची संख्या सर्वाधिक आहे.
भिवंडी तालुक्यातील तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल चाळीस बांगलादेशींना पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अटक केली होती. हे सर्व बांगलादेशी नागरिक कुठलाही अधिकृत विसा नसताना पैसे कमावण्याच्या उद्देशाने छुप्या मार्गाने दलालाच्या मदतीने बांगलादेशातून भिवंडीत येऊन अनधिकृतपणे वास्तव्यास राहून मजुरी करीत असल्याचे आढळून आले होते. भिवंडीतील कोनगाव पोलिसांनी देखील अशाच प्रकारे अवैध वास्तव्य करणाऱ्या नऊ बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाई करून त्यांना अटक केली होती. अटकेतल्या बांग्लादेशींकडून बनावट पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड पोलिसांनी जप्त केले आहेत. तसेच ठाणे शहर व ठाणे ग्रामीण पोलिसांनी वेळोवेळी केलेल्या कारवाई मधून मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक मुंबई, ठाणे परिसरात घुसखोरी करीत असल्याचे स्पष्ट होत आहे.
गेल्या काही वर्षात भारतात घुसखोरी करून येणाऱ्या बांगलादेशी नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यातच भारतात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींचा कल मुंबईत येण्याकडे सर्वाधिक असतो. मात्र मुंबईसारख्या महानगरात सहजासहजी निवारा मिळत नसल्याने हे घुसखोरी करून आलेले बांगलादेशी मुंबईमहानगरासह, नवी मुंबई, ठाणे, मुंब्रा, दिवा, कल्याण, आंबिवली, भिवंडी, मीरारोड, भायंदर, वसई, विरार, पालघर, बोईसर या भागात आपला निवारा थाटत असल्याचे आढळून आले आहे. या वाढत्या बांगलादेशी नागरिकांच्या लोंढ्यांना थांबवण्याचे आदेश गृहविभागाने ठाणे आयुक्तालय आणि ठाणे ग्रामीण पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी या बांगलादेशी नागरिकांवर आपली नजर रोवली आहे. पोलीस दस्तावेजावरील माहिती नुसार ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, पालघर जिल्ह्यात सुमारे 18 हजार अवैध बांगलादेशींची संख्या आहे. त्यात मजुरी करणारे तसेच वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आणि बारबाला यांची संख्या सर्वाधिक आढळून आली आहे. बांगलादेशी मुली घरकाम करून गुजराण करतात. मात्र अनेकवेळा त्यांना जबरदस्तीने अनैतिक व्यवसायात ओढण्यात येते. ठाणे पोलिसांच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात पोलिसांनी 178 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. बांगलादेशी नागरिकांना अटक केल्यानंतर त्यांना कोर्टाच्या आदेशानुसार बांगलादेश सीमेवर सोडण्यात येते. मात्र, नंतर हेच नागरिक परत घुसखोरी करून भारतात परत येतात. त्यामुळे या बांगलादेशी नागरिकांना आळा घालणे मोठे मुश्किल काम होऊन बसले आहे अशी माहिती गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने दिली.
भारतात चोरीच्या मार्गाने येण्यासाठी प्रत्येकी हजार ते सात हजार टका (बांगलादेशी चलन) दलाल बांगलादेशीकडून घेतात. 20-25 इच्छुक जमल्यावर हा दलाल बांगलादेश रायफल्सच्या जवानांसोबत सौदा करतो. त्यानंतर कधी अंधाराचा फायदा घेत हे लोक कोलकात्यातील दलालापर्यंत पोहोचतात. भारतात राहण्यासाठी रेशन कार्ड किंवा पॅन कार्ड यासारखी बोगस कागदपत्रे इथेच बनवली जातात आणि मग हे बांगलादेशी नागरिक मोठ्या संख्येने मुंबई ठाण्यात येऊन धडकतात. येथे आल्यावर मिळेल ते काम हे नागरिक स्वीकारतात. त्यात बहुतांश पुरुष मजुरी करतात तर मुली घरकाम आणि अनैतिक व्यावसायाकडे वळतात.
नकली दस्तावेजांच्या आधारे बनावट पासपोर्ट बनवणाऱ्या दोघांना मुंबईच्या एटीएस पथकाने मागील वर्षी मुंब्रा येथून अटक केली होती. रफिक सैय्यद आणि इद्रिश असे एटीएसने ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे होती. या दोघांच्या ताब्यातून तब्बल शंभरहून अधिक बनावट पासपोर्ट जप्त करण्यात आल्यानंतर जप्त करण्यात आलेल्या बनावट पासपोर्ट मध्ये घुसखोर बांगलादेशी नागरिकांसाठी बनवण्यात आलेले नकली पासपोर्ट आढळून आले होते. या गुन्ह्याच्या तपासात बांगलादेशी नागरिकांना पासपोर्ट, आधार कार्ड, रेशन कार्ड व इतर नकली दस्तावेज बनवून देणाऱ्या टोळ्या ठाणे-मुंबई परिसरात कार्यरत असल्याचे उघड झाले होते.
हेही वाचा