ठाणे

Plastic dumping impact : भंगार माफियांचे फावले, बळीराजाचे नुकसान; १४ गावांतील शेती आता प्लास्टिकच्या ढिगाऱ्याखाली

कल्याण लोकसभेतील धक्कादायक वास्तव उजेडात

पुढारी वृत्तसेवा

शुभम साळुंके

ठाणे : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील १४ गावांमध्ये भंगार माफियांचा हैदोस दिवसेंदिवस वाढत असून आता त्याचा फटका बळीराजालाही बसू लागला आहे. दहिसर ग्रामपंचायत हद्दीतील भंगार माफियांनी टाकलेल्या प्लास्टिक व इतर कचऱ्यामुळे दहिसर मोरी परिसरातील शेतकऱ्यांची सुपीक जमीन अक्षरशा उद्ध्वस्त झाली आहे. या गंभीर प्रकारामुळे पर्यावरणासह शेतीचे मोठे नुकसान होत असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दहिसर मोरी येथील शालिक पाटील, शरद पाटील, दीपक पाटील आणि विनायक जयपाल यांच्या भात शेतामध्ये भंगार माफियांनी टाकलेल्या प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. पावसाच्या पाण्यासोबत हा प्लास्टिक कचरा थेट शेतीमध्ये येऊन साचल्याने लागवडीयोग्य जमीन नापीक होण्याच्या मार्गावर आहे. भात लागवडीचा हंगाम सुरू असतानाच शेतात प्लास्टिकचे थर साचल्यामुळे शेतकऱ्यांना यंदा भात पिकाची लागवड करणेही कठीण झाले आहे.

विशेष म्हणजे १४ गावांमध्ये भंगार माफियांच्या बेकायदेशीर कारवायांविरोधात सातत्याने तक्रारी होत असताना प्रत्यक्ष कारवाईचा धडाका हाती घेतला जात नाही. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास, नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमण आणि आता शेतीचे नुकसान अशा गंभीर परिणामांनंतरही जबाबदार यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने संताप व्यक्त होत आहे. शिवसेनेचे संसदेतील गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे आणि कल्याण ग्रामीण मतसादरसंघाचे आमदार राजेश मोरे यांच्या मतदारसंघातील हि परिस्थिती समोर आली आहे. त्यामुळे आता प्रशासनाच्या कारवाईकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

या प्रकाराची तातडीने चौकशी करून भंगार माफियांवर कठोर कारवाई करून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक नुकसानभरपाई द्यावी आणि शेतीमधील प्लास्टिक कचरा हटविण्यासाठी विशेष मोहीम राबवावी,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. भंगार माफियांना नेमके कोणाचे राजकीय आणि प्रशासकीय संरक्षण मिळत आहे, असा सवालही आता उपस्थित होत आहे. बळीराजाची शेती वाचवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन प्रत्यक्ष मैदानात उतरणार की नेहमीप्रमाणे आश्वासना पुरतेच मर्यादित राहणार, याकडे संपूर्ण १४ गावांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT