Mumbai Nashik Highway Accident
कसारा : मुंबई-नाशिक महामार्गावरील नवीन कसारा घाटात कंटेनर पलटी होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. जालिंदर भगत आणि अनुसया भगत अशी मृत दाम्पत्याची नावे असून, ते घोटी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी हे दाम्पत्य घोटीहून कसाऱ्याकडे निघाले होते. मात्र, त्यांच्या दुचाकीवर कंटेनर पलटी झाल्याचे लक्षात न आल्याने हा भीषण प्रकार दुसऱ्या दिवशी कंटेनर हटविण्याचे काम सुरू असताना उघडकीस आला.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी नाशिकहून मुंबईच्या दिशेने कंटेनर क्रमांक एनएल ०१ एन ०६८८ जात होता. सकाळी सुमारे अकराच्या सुमारास नवीन कसारा घाटातील नागमोडी वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनर रस्त्यावरच पलटी झाला. या अपघातात कंटेनरच्या खाली दुचाकी अडकल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. सुरुवातीला कंटेनर पलटी झाल्याची आणि कोणालाही दुखापत झाली नसल्याची नोंद कसारा पोलिसांकडे करण्यात आली.
दुसऱ्या दिवशी अपघातग्रस्त कंटेनर हटविण्याचे काम सुरू झाले. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथकाचे सदस्य लक्ष्मण वाघ, जसविंदर सिंग, दत्ता वाताडे आणि बाळू मांगे हे क्रेनसह घटनास्थळी दाखल झाले. कंटेनर हटविताना परिसरात उग्र वास येऊ लागल्याने पथकातील सदस्यांना संशय आला. त्यांनी तत्काळ पथकाचे अध्यक्ष शाम धुमाळ यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर कसारा पोलिसांना कळविण्यात आले.
माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथक, महामार्ग पोलिसांचे घोटी केंद्र आणि कसारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजूला केल्यानंतर खाली दबलेली दुचाकी आणि पती-पत्नीचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दोन्ही मृतदेह रुग्णवाहिकेतून कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.
जालिंदर भगत आणि अनुसया भगत हे वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी कसाऱ्याकडे निघाले होते. मात्र, ते कार्यक्रमस्थळी पोहोचले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी रात्रीपासून शोध सुरू केला होता. बराच वेळ शोध घेऊनही त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळत नव्हती. शनिवारी सकाळी कसारा घाटातील अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी कंटेनरखाली सापडलेले मृतदेह भगत दाम्पत्याचे असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निखिल लसने, सहायक पोलीस निरीक्षक राकेश कदम, पोलीस हवालदार उमेश चौधरी आणि देवेंद्र शिरसाठ पुढील तपास करीत आहेत.